खामगांव : शासकीय मुद्राणांकाची कृत्रिमरीत्या टंचाई निर्माण करीत वाढीव भावाने विक्री करणे खामगाव मध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण देशात कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकरी व सामान्य जनतेच्या समस्यांमध्ये अधिक वाढ झालेली आहे.अशातच आपल्या विविध कामांकरिता तहसील कार्यालय व इतर कामांकरिता खरेदी करण्याकरिता आलेल्या शेतकरी व सामान्य माणसांकडून अधिक पैसे घेत मुद्रांक विकले जात आहे.मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी यांनी पंचायत समिती जवळील देशमुख नामक व्यक्तीचे लायसन्स रद्द केले आहे. मात्र जुन्या कोर्ट रस्त्यावरील एक टायपिंग व मुद्रांक विक्रेता व विदर्भ कोकण ग्रामीण बँके खालील एक मुद्रांक विक्रेते यांच्या सुद्धा दुकानांवर 100 रुपये किमतीचे शासकीय मुद्रांक 150 ते 200 रुपये व 500 चे मुद्रांक 700 ते 800 दराने विक्री करत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. आपल्या दुकानावर शासकीय मुद्राकांची साठवण करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी मुद्रांकाची कृत्रिमरीत्या टंचाई निर्माण करून जनतेकडून मुद्रांका करिता शासकीय दरापेक्षा जादा रक्कम घेऊन जनतेची व शासनाची फसवणूक करत असल्याचे दिसत आहे. याबाबत तत्कालीन दुय्यम निबंधकांना गुप्ते यांना वारंवार तक्रार दिली असता ते कुठलीही कारवाई त्यांच्यावर करत नाहीत व ते अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. खामगाव येथील मुद्रांक विक्रेते अधिक दराने मुद्रांक विक्री नेहमीच करत असून याविरुद्ध कोणी आवाज उठविल्यास हे मुद्रांक विक्रेते सामूहिकरित्या मुद्रांक विक्री बंद करतात. तसेच मुद्रांक विक्री बाबत मोठा घोटाळा करून अरेरावी करत असतात. हे सर्व मुद्रांक विक्रेते बाहेरिल जिल्ह्यातील मुद्रांक आणून विक्री करत आहे. जिल्ह्यातून याबाबत संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष जाणीवपूर्वक होत असल्याचे निदर्शनास येते तसेच बहुसंख्य नागरिक तथा शेतकरी नाइलाजास्तव चढ्या भावाने मुद्रांक घेत आहे. नव्यानेच रुजू झालेल्या दुय्यम निबंधक आर. आर. पवार यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी व शासनाची फसवणूक करणाऱ्या ची लायसन्स रद्द करावी अशी मागणी शेतकरी व सामान्य जनतेकडून होत आहे.