जिल्ह्यात ६१४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण; जिल्ह्यात १३ मृत्यु
बुलडाणा : कोरोना महामारीने जगाला हैराण केले असून वाढते मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. मागील काही दिवसात खामगांव मधे कोरोनाने मृत्यु होणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे खामगांवकरांच्या चिंतेत भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून दररोज या आजाराने काहींचे मृत्यु होत आहे. जिल्ह्यात मृत्यूचे तांडव कायम असतानाच २४ तासांत १३ रुग्णाचा मृत्यु झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाने मृत्यु झालेल्यांची संख्या ४४७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आज कोरोनाने मृत्यु झालेल्या १३ पैकी ९ रुग्ण हे कोरोनाचे हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या खामगाव सामान्य रुग्णालयातील आहे. यामुळे खामगाव सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणासमोरील आव्हाने आणखी खडतर झाली आहे. बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील ३ तर शेगाव सामान्य रुग्णालयातील १ रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाने मृत्यु होणाऱ्याची संख्या वाढताना दिसत आहे. मागील चार दिवसांपासून खामगाव रुग्णालयात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून चार दिवसात या रुग्णालयातील २४ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही अतिशय चिंताजनक आकडेवारी असून यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या मध्ये तरुण वर्गाचा समावेश जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे खामगांवकरांची चिंता वाढली असून नागरिकांना आता आपली अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.