पाच अटकेत,बाकीच्यांचा शोध सुरू ….
खामगाव: पोळा सणाच्या मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळपर्यंत पाच आरोपींना अटक केली. घटनेनंतर तातडीने पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी शहराच्या विविध भागात सर्च ऑपरेशन राबविले.खामगाव शहरातील फरशी भागात मानाच्या बैलजोडीचे पूजन झाल्यानंतर निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद उफाळला. वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. या प्रकारामुळे प्रचंड तारांबळ उडाल्यानंतर पोलीस दलाने दोन्ही गटातील ७६ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्याचवेळी शहराच्या विविध भागात रात्रभर शोध मोहिम राबवून पाच आरोपींना अटक केली. याप्रकरणी सुनिल गोरले यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, १६० तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दगडफेक झालेल्या भागात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तळठोकून आहेत.
पाच जणांना अटक
श्याम क्षीरसागर, शहजाद खान रऊफ खान, गणेश जांभे, उमेश अग्रवाल, फारुक खान गफ्फार खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
७६ जणांविरोधात गुन्हा
सुनिल ज्ञानदेव गोरले यांच्या तक्रारीवरून शिवम शैलेश मिश्रा, काजू उर्फ उमेश गोपाल अग्रवाल, बॉबी पंजवानी, श्याम गणेश क्षीरसागर, ऋषीकेष कावणे, गोलू अग्रवाल, फारूक खान गफार खान, बबलू परवेज आतीक खान, शहाजाद खान रऊफ खान, शे. जाबीर शे. रज्जाक , शे. कादीर शे.नासीर, सुमित वास्कर, गणेश जांभे, गणेश देशमुख, सोनू परकाळे, योगेश जाधव यांच्यासह ७६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.