खामगांव – नांदुरा महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा उभे केलेले काही विद्युत खांब खचल्याने मोठ्या प्रमाणात वाकले आहेत. हे आडवे झालेले खांब ढासळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वेळीच हे खांब सरळ करणे गरजेचे आहे. दरम्यान, महावितरणच्या दुर्लक्षामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार राहणार? असा सवाल संतप्त नागरिकांमधून विचारला जात आहे. खामगांव- नांदुरा व खामगांव – शेगांव रोडचे काम गेल्या 2 वर्षापासून सुरु आहे. हया रस्त्याच्या दुतर्फा विज पुरवठा करण्यासाठी नवीन पोल उभे करण्यासाठी MSEDCL ने मर्जीतल्या ठेकेदाराची निवड करुन त्यास ठेका देण्यात आला होता. पण, त्या नेमलेल्या ठेकेदाराने कामगारांमार्फत खड्डे काढुन घाई गडबडीत पोल उभे करून स्वत:च्या कामाचे पैसे काढुन घेतले.
वास्तविक पाहता काम सुरु झाल्यावर जबाबदार अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हे काम करणे आवश्यक असतानासुध्दा या कामात ‘सर्व कामकाज ओके’ असल्याचा बोगस अहवाल तयार करण्यात आला आणि त्या अहवालानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसलीही पाहणी न करताच त्या मर्जीतील ठेकेदाराचे लाखो रुपयांचे बिल काढुन देण्यात आले. आठ महिन्यापूर्वी पोल उभे करुन दिल्यानंतर काही दिवसातच त्यावर लाईटच्या तारा ओढण्यात आल्या. पण,लगेच 15 दिवसानंतर काही पोल आडवी झाली आहेत. तरी महावितरण कंपनी ने या कडे तात्काळ लक्ष देऊन ठेकेदाराविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी.