खामगाव : संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्हाभरात निर्बंध लावले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने ही सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील त्याशिवाय अन्य कुठलीही दुकाने उघडण्यास परवानगी नाही. मात्र खामगाव शहरामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना काही दुकानदार दिसून येत आहे. यामध्ये खामगाव येथील मेन रोड वरील वाहेद कलाम व रूपनिखार साडी सेंटर या दोन दुकानांवर नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. या दोन्ही दुकानदारांनी परवानगी नसताना सुद्धा दुकाने सुरू ठेवली होती. दोघांनाही ११ हजार रुपयांचा दंड नगरपरिषद कडून देण्यात आला. याबाबत सविस्तर असे की आज सकाळी नगर परिषद कर्मचारी व पोलिस प्रशासनाचे कर्मचारी सकाळी ११ वाजता दुकाने बंद करण्याकरिता मेन रोड वरून जात असताना त्यांना माहित पडले की मेन रोड वरील आहेत वाहेद कलाम व रूपनिखार साडी सेंटर या दोनही दुकानांमध्ये ग्राहक खरेदीसाठी आले आहेत. यावेळी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वाहेद कलाम या दुकानदारास ११ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. सोबतच याच दुकानाच्या बाजूला असलेल्या रूप निखार साडी सेंटरवर सुद्धा नगरपरिषदेकडून कारवाई करण्यात आली व त्यांना सुद्धा ११ हजार रुपयांचा दंड देण्यात आला. विशेष म्हणजे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दुकानांमध्ये किती ग्राहक आहेत याची सुद्धा पाहणी केली नाही दोन्ही दुकानदारांनी आपले दुकान बाहेरून बंद करून ग्राहकांना आत मध्ये थांबऊन ठेवले होते.ज्यावेळेस नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दोघांनाही ११ हजार रुपयाचा दंड लावून कारवाई केली, त्यानंतर त्यांनी आपल्या दुकानातील ग्राहकांना शटर उघडून बाहेर जाऊ दिले.
यावेळी नगरपरिषदेचे एकही कर्मचारी ग्राहकांवर कारवाई करताना दिसला नाही. यावेळी नगर परिषद मधील एका कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दुकानदारावर कारवाई केली त्यामुळे ग्राहकांवर कारवाई नाही केली तरी चालते, असे उत्तर देण्यात आले. या सर्व प्रकाराबाबत निर्भीड स्वराज्यने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आकोटकर यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, कारवाई ही लॉकडाऊन परवानगी नसताना दुकान उघडे ठेवणे यासाठी दुकान मालकावर तर विना मास्क व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणे याकरिता ग्राहकांवर कारवाई व्हायला हवी. याबाबत मला अजून काही माहिती आली नाही त्यामुळे मी चौकशी करुन सांगतो असे सांगितले. मात्र नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांवर कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे ही कारवाई सेटलमेंट कारवाई केली का ? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. या दोन्ही दुकानांमध्ये जवळपास ४० ग्राहक असल्याची खात्रीलायक बातमी निर्भिड स्वराज्यकडे आहे. नगरपरिषद व पोलीस प्रशासन कारवाई करीत असताना यावेळी तेथे कारवाई टाळण्यात यावी याकरिता एक तथाकथित नेता तसेच जलालपू-यातील “जगदंबा” मातेच्या कृपेने चालणारे दुकान मालक त्याठिकाणी सेटलमेंट करण्यात आले होते. व नगरपरिषद कर्मचाऱ्यांना फक्त २ हजार रुपये फाईन लावा याकरीता तगादा लावत होते. मात्र त्या ठिकाणी पत्रकार उपस्थित असल्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दोन्ही दुकान मालकांना ११ हजार रुपयांचा प्रत्येकी दंड दिला व दुकानांच्या आत मध्ये असलेल्या ग्राहकांवर कुठलीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे नगरपरिषद कडून कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेले देशमुख व कर्मचारी तेथे उपस्थित असताना रूपनिखार साडी सेंटर च्या मालकाने दुकान उघडून ग्राहकांना बाहेर सोडले. रूपनिखार साडी सेंटर दुकानातून जवळपास २० ग्राहक तर ४ कर्मचारी निघाले होते. तरी सुद्धा नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी त्या ग्राहकांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ही कारवाई सेटलमेंट कारवाई तर नाही ना ? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आता या कारवाईवर नगर परिषद मुख्याधिकारी काय निर्णय घेतील हे पहावे लागणार आहे. यामुळे नगरपरिषदेकडून फक्त नावालाच थातूरमातूर कारवाई करण्यात येते व छोट्या दुकानदारांना मात्र सर्व प्रकारचे दंड लावण्यात येतात असा भेदभाव सुरू असल्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे.