खामगांव : लॉकडाऊनमध्ये शहरात सर्वत्र कोरोना विषाणूंचे भय असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरात सफाई कामगार काम करीत आहेत. अश्या कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्याचे काम खामगावातील एका नगरसेवकाने केले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांना सॅनिटायझर, मास्क आणि जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव सुध्दा करण्यात आला.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव येथील नगरसेवक तथा पत्रकार सतीषआप्पा दुडे यांनी आपल्या प्रभागातील सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रविवारी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून सत्कार करून त्यांना जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या आहेत व त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत अनोखा उपक्रम राबविला आहे. यावेळी भाजपा नगरसेवक सतीषआप्पा दुडे यांनी वेगळ्या पद्धतीने सफाई कामगारांचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमात खामगांव मतदार संघातील आमदार अॅड. आकाश फुंडकर, नगराध्यक्षा अनिता डवरे, उपाध्यक्ष मुन्ना पुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाचे खामगांव शहरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.