बुलडाणा : जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेला खकडपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्प 70.12 टक्के भरला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा काल प्रशासनाच्यावतीने देण्यात आला होता. प्रकल्पाच्या उर्ध्व भागात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा विसर्ग धरणात येत आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक वाढली तर कोणत्याही क्षणी पूर नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे उघडावे लागणार असल्याचे कालच खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षा कडून सांगितले होते. आज सकाळी 9:00 वाजता खडकपूर्णा प्रकल्पाचे एकूण 05 वक्रद्वारे 20 cm उघडली असून नदीपात्रात 3808 क्यूसेकं (107.84 cumec) एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे खडकपूर्णा नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे असे खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षा कडून सांगितले आहे.