‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती सेनॉनचा आता कलाविश्वातील दबदबा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा चाहत्यांमध्ये तिच्याविषयीच्या चर्चा रंगत असतात. यामध्येच क्रितीविषयी एक नवीन चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे. सध्या सोशल मीडियावर क्रितीचा एक फोटो व्हायरल होत असून यात ती बेबीबंपसोबत दिसत आहे. त्यामुळे क्रिती आई होणार की काय? ही चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.
‘बरेली की बर्फी’, ‘लुकाछुपी’, ‘हाऊसफुल 4’ या लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर ती लवकरच ‘मिमी’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून या चित्रपटाच्या सेटवरील क्रितीचा फोटो लीक झाला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये क्रिती गरोदर स्त्रीच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या फोटोची चर्चा आहे.
‘मिमी’ या चित्रपटात क्रिती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून या भूमिकेसाठी तिने तब्बल १५ किलो वजन वाढवलं आहे. या चित्रपटाची कथा एका सरोगेट मदरभोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवा स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटानंतर क्रिती अक्षयकुमारसोबत ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातही झळकणार आहे.