सामान्य रूग्णालयाला दिले 400 लीटर सोडियम हायपोक्लोराइट
खामगांव : येथील सामान्य रूग्णालयातील कोविड सेंटर मध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा व सुविधा मिळाल्याबद्दल कोरोनामुक्त झालेल्या रूग्णाने सोडियम हायपोक्लोराइट भेट देवून कृतज्ञता व्यक्त केली आहे. येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे आशिष सुरेका यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे 21 सप्टेंबर रोजी सामान्य रूग्णालयातील कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आले होते. कोरोनामुक्त झाल्याने त्यांना नुकतीच रूग्णालयातून सुटी देण्यात आली.
उपचारादरम्यान कोविड सेंटर मध्ये मिळत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधा पाहून त्यांना आपणही रूग्णालयाला काही मदत करावी असा विचार त्यांच्या मनात आला व त्यांनी 2 ऑक्टोबर रोजी सोडियम हायपोक्लोराइट च्या 5 लिटरच्या 80 कॅन म्हणजेच 400 लिटर सोडियम हायपोक्लोराईट सामान्य रूग्णालयासाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्या सुपुर्द केले. यावेळी खामगांव मतदार संघाचे आ.आकाश फुंडकर, रुग्णकल्याण समिती सदस्य संजय सिनगारेे, नगरसेवक संदीप वर्मा,भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पवन गरड,हिंदुत्व ग्रुप शहर अध्यक्ष प्रतीक जोशी, रघु तिवारी, जय बघेल, राहुल बशिरे, प्रवीण सिसोदिया, शांतनू गोलाईत,निकुंज मंधानी आदी उपस्थित होते.