बुलढाणा जिल्ह्यात चार ठिकाणी होणार ड्राय रन
पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, कर्मचारी यांना मिळणार लस
बुलडाणा : शासनाच्या निर्देशानुसार लवकरच कोविड 19 या साथरोगाची लस उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्था येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. लस येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती ती लस अखेर येणार आहे. प्रथम फेरीत जिल्ह्यातील को विन ॲपवर नोंदणी झालेली असून त्यांची संख्या 12 हजार 306 आहे. ही लस देण्यासाठीची पुर्वतयारी म्हणून जिल्ह्यात चार ठिकाणी 8 जानेवारी 2021 रोजी रंगीत तालीम करण्यात येणार आहे. हा ड्राय रन जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा, ग्रामीण रूग्णालय दे. राजा, प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगांव ता. मेहकर व प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा ता. संग्रामपूर येथे सकाळी 9 वाजतापासून करण्यात येणार आहे. लसीकरण सत्राच्या ठिकाणी तीन खोल्यांचा अंतर्भाव असून त्यामध्ये प्रतीक्षा कक्ष, निरीक्षण कक्ष व लसीकरण कक्ष असे विभाग आहेत. या लसीकरणासाठी 25 लाभार्थी बोलाविण्यात आले असून त्यांची नोंदणी यापूर्वीच को विन ॲपमध्ये करण्यात आली आहे. त्यांचे मोबाईलवर लसीकरणाबाबतची तारीख व वेळ, ठिकाण याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून अगोदरच्या दिवशी देण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी पाच अधिकारी काम करणार आहेत.
लाभार्थ्यांना मोबाईल क्रमांकावर मिळालेल्या मॅसेजची खात्री करून त्यानंतर त्याची ओळख पटवून नंतर कोविन ॲपमध्ये अगोदर नोंद केल्याची खात्री करून लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणानंतर लाभार्थ्यांना 30 मिनीटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून कोणताही त्रास नसल्याची खात्री करूनच लाभार्थ्यांना सोडण्यात येणार आहे. सोडताना लाभार्थ्यांना पुढील डोसची तारीख व काही त्रास झाल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहे. या लसीचे एकूण दोन डोस देण्यात येणार आहे. या रंगीत तालीमसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे व तहसिलदार रूपेश खंडारे आदी उपस्थित राहणार आहेत.