खरीप हंगाम पीक कर्ज वितरण बैठक
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीमुळे यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्जाचा मोठा आधार मिळणार आहे. बँकांनी कुठल्याही प्रकारे शाखांमध्ये गर्दी न होता, साथरोग प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून पिक कर्ज वितरणाची कार्यवाही करावयाची आहे. त्यासाठी आतापासून बँकांनी सोपी व पारदर्शक पद्धत अंगीकारून पिक कर्ज वितरणाचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम पीक कर्ज वितरण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. मनवर, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. बँकांनी आपल्या क्षेत्रानुसार नियोजनबद्धरितीने पीक कर्जासाठी कागदपत्रे घेण्यासाठी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, यावेळी शेतकऱ्यांकडून सोशल डिस्टसिंगचे पालन करीत कागदपत्रे घ्यावीत. त्यासाठी एक फेरी आयोजित करावी.
तर दुसऱ्या फेरीत पिक कर्ज वितरण करावे. शेतकऱ्यांना यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होवू देवू नये. शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी. तालुकास्तरावर बँकांनी बैठका घेवून त्यासाठी महसूल यंत्रणेचा सहभाग घ्यावा. बँकांकडे यापूर्वी ज्या शेतकऱ्यांची केवायसी केलेली असेल किंवा केवायसीसाठी कागदपत्रे घेतलेली असतील, तर त्यांच्याकडून पुन्हा कागदपत्रे मागवू नये. यावेळी जिल्ह्यातील विविध बँकाकडून पात्र शेतकरी, पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आदींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.