खामगांव/ नांदुरा : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबता थांबत नाही आहे. कोरोना बाधित सर्व रुग्ण उपचारानंतर घरी गेल्या नंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोना पाय पसरवीत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जामोद येथील एका युवकाला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर संपूर्ण जळगाव सह शहर सील करण्यात आले आहे. तर आता बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथून बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात आलेल्या एका महिलेचा काल मध्यरात्री खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या महिलेचा रिपोर्ट सध्या अप्राप्त आहे.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या २४ होती. यामध्ये हे एकाचा मृत्यू तर २३ रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. यानंतर बऱ्हाणपूर मध्य प्रदेशात नातेवाईकाच्या अंतिम संस्कारासाठी गेलेल्या जळगाव जामोद येथील एका युवकाला कोरोना झाल्याचे समोर आले. यामुळे यामुळे जळगाव जामोद हे शहर सध्या सील करण्यात आले आहे. तर आता दुसरीकडे याच मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहरातून एक महिला आपल्या स्वगृही नांदुरा शहरात पोहोचल्यानंतर या महिलेची तब्बेत खराब झाल्याने मंगळवारी रात्री रुग्णवाहिकेने खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालय मधील आयसोलेशन वॉर्ड मध्ये दाखल करण्यात आले मात्र काल मध्यरात्री या महिलेने अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तत्पूर्वी आरोग्य विभागाने सदर महिलेचे नमुने घेतले असून तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.