खामगाव : जगभरात करोना व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. भारतात सुध्दा या व्हायरस ची लागन झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. तेव्हा आपल्या भागात कोरोना व्हायरस संदर्भात नागरिकांनी घाबरून न जाता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले. खामगांव उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ६ मार्च रोजी स्थानिक सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक यांचे दालनात कोरोना व्हायरस संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण,खामगांव तहसिलदार डॉ.शितल रसाळ, सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनकर खिरोडकर, वैदयकीय अधिकारी डॉ.गुलाब पवार यांची उपस्थीती होती. यावेळी बोलताना मुकेश चव्हाण यांनी कोरोना विषाणू आजारा विषयीची माहिती दिली व आजाराची लक्षणे, हा आजार कसा पसरतो, हा आजार होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे सांगितले. सोशल मीडियावर कोरोना संदर्भात येणाऱ्या माहितीची शहानिशान करता चुकीची माहीती पुढे पाठवू नये. यामुळे नागरिकामध्ये संभ्रम निर्माण करून भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे खात्री करूनच माहिती सोशल मीडियावर व्हायरल करावी. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी सांगितले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. टापरे यांनी यावेळी रुग्णांना विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. सामान्य रुग्णालयात विलगीकरन कक्ष स्थापन करण्यात आला असून हा विभाग २४ तास सुरू राहणार आहे. कोरोना विषयी शंका दूर करण्यासाठी सामान्य नागरिकांसाठी शासनाने १०४ टोल फ्री नंबर ची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे नागरीकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन डॉ टापरे यांनी केले.