शिक्षक करतायत नवनाथाच्या वेशभूषेत कोरोना लसीकरनाची जनजागृती
गावागावात फिरून पटवतायत लसीकरणाचे महत्व
बुलडाणा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने हा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे , लसीकरणा संदर्भात नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील केली जात आहे, तर प्रशासनाला हातभार आणि सामाजिक बांधिलकी जोपासत बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद च्या शाळेतील शिक्षक राजेश कोगदे हे नवनाथांचा पोषाख घालून गावागावात जाऊन कोरोना लसीकरणासाठी गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक राजेश कोगदे हे कोरोना लसीकरणा संदर्भात आपल्या केंद्रांमधील गावांमध्ये कोरोना लसीकरण जनजागृती एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने करताना पहावयास मिळत आहेत. यामध्ये या शिक्षकांकडून प्रत्येक गावांमध्ये जाऊन ज्या गावांमध्ये लसीकरण कॅम्प घेण्यात येत आहे अशा गावांमध्ये आदल्या दिवशी कोरोना लसीकरणा संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे , नागरिकांच्या मनातील भीती, गैरसमज दूर करून जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी नागरिकांना प्रवृत्त करत आहेत. शासनाकडून विविध पथनाट्य, आणि कलाकारांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे, मात्र शिक्षक राजेश कोगदे यांनी ग्रामीण भागात मनाला भावणाऱ्या नवनाथांची वेशभूषा करून त्यांना समजेल अशा भाषेत लसीकरणाचे महत्व पटवून लस घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे, तर या जनजागृती मुळे लसीकरणाच्या बाबतीत गावकऱ्यांच्या मनात असलेल्या शंका, गैरसमज दूर होत असून गावकरी लसीकरणासाठी मोठा प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे, आणि शिक्षकाच्या या वेगळ्या युक्ती साठी केंद्रप्रमुख रवींद्र चेके स्थानिक प्रत्येक गावातील शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच, पोलीसपाटील हे सर्वच सहकार्य करत आहेत. तर अशा जनजागृती साठी शासनाकडून शिक्षकांना कुठलेच आदेश नसतांना केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षक राजेश कोगदे यांचा प्रयोग नक्कीच वाखाण्याजोगा आहे.