जिल्हाधिकारी, महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि पत्रकारांनी केले रक्तदान
बुलडाणा : कोरोना च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्त पुरवठा कमी होत असल्याची शंका व्यक्त करत रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत बुलडाणा जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या माध्यमातून रक्तदान केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिर पार पडले , यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह , इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार असे २८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले.