बुलडाणा : कोरोना च्या धास्तीने कोंबडीचे मास खाणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. बुलडाणा जिल्ह्यात याच व्यावसायिकांकडून हजारो कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत. चिकन पासून कोरोना होतो का ? याबाबतीत जनजागृती केली जातेय मात्र ही भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे, त्यामुळे होळीच्या हंगामात देखील कोंबडीच्या मांसाला अपेक्षित अशी मागणी नसल्याने खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव येथील कुक्कुटपालन व्यावसायिक शालीग्राम मेतकर यांनी विक्रीसाठी तयार असलेल्या दोन हजार कोंबड्या जमिनीत गाडून नष्ट केल्या आहेत. कोंबडीच्या पिल्ला पासून चाळीस दिवसात साधारणतः दोन किलोची कोंबडी तयार होते त्यासाठी एक कोंबडी वर १५० रुपये खर्च होतो आणि आणि आता होळीचा हंगाम असून देखील पाहिजे त्या प्रमाणात ह्या मांसाला मागणी तर नाहीच आणि भाव देखील नाही. तसेच आता उन्हाळा असल्यामुळे उन्हाळ्यात तर चिकन खाणाऱ्यांची संख्या कमीच होत असते, त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसत असून मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. झालेला खर्च तरी काढायचा कसा हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे.निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतातून लावलेला खर्च ही निघत नसल्याने शेतीला पूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकरी धडपड करतोय मात्र यातही शेतकऱ्यांवरील संकट कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे कुक्कुटपालन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदतीची मागणी पुढे येत आहे, तर झालेल्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयात नोंद करून देण्याचे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
previous post