कोरोनामुळे संपूर्ण जग हादरून गेलंय. या भयंकर बिमारीने होणारे मृत्यू, व्यवसाय ,उद्योग ,खाजगी नोकऱ्या बंद झाल्याने निर्माण झालेला सामान्य नागरिकांच्या-लहान मोठ्या व्यावसायिकांच्या उत्पन्नाचा प्रश्न, संपूर्ण देशातील मजूर वर्गाचे स्थलांतरा अभावी होणारे अमानुष हाल हे कोरोनाने मानवी जीवनावर व मनावर केलेले आघात आहेत. ह्या जखमा जरी भविष्यात भरून निघाल्या तरी याचे व्रण आयुष्यभर काळजावर राहणार आहेत. या अतिशय वाईट गोष्टींसह कोरोनाने मानवांना एक देणगीसुद्धा दिली आहे ती म्हणजे आपल्या आयुष्यात काय कमी होत? कशाची गरज नव्हती? कुठे चुकत होतो? हे समजण्याची व अनुभवण्याची संधी. या कोरोना लॉकडाऊन काळात जे निरीक्षण केले, अनुभवलं ते लिहून सांगणं गरजेचं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच. मला २ मुलं आहेत एक ९ वर्षांचा, दुसरा साडे ५ वर्षांचा. २१ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालाय म्हणजेच जवळपास ६० दिवस होत आहेत. हा कोरोना यायच्या आधी मुलांना महिना-पंधरा दिवसातून एकदा तरी सर्दी-खोकला, कफ-श्वास घ्यायला त्रास होणे, ताप किंवा अजीर्ण(लूज मोशन) यापैकी एका कारणासाठी डॉक्टर कडे न्यावं लागायचं किंवा घरीच औषधी द्यावी लागायची परंतु या ६० दिवसांच्या काळात वरील सर्व कारण सोडा पण मुलांना साधी शिंक सुद्धा आलेली मी पाहिली नाही. आपल्याच मुलांसोबत अस होत आहे की इतरांचा पण हाच अनुभव आहे हे तपासून बघण्यासाठी मी शहराच्या विविध भागात राहणाऱ्या माझ्या १० परिचितांना फोन केले आणि माहिती घेतली तर त्यांचे सुद्धा हेच मत होते. मग मात्र राहावल नाही आणि असे का घडत आहे यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर पुढील काही गोष्टी लक्षात आल्यात. लॉकडाऊन मुळे घराबाहेर निघणे कमी म्हणून वाहनांच्या वापरात कमालीची घट आली आहे. विशेषतः सार्वजनिक वाहतूक बंद आहे. त्यात रोज रस्त्यावर धावणारे हजारो ऑटोरिक्षा आणि बसेस. हे बंद असल्यामुळे या वाहनांमध्ये जळणाऱ्या इंधनांमुळे त्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड च्या प्रमाणात कमालीची घट झाली. या वाहनांमुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात उडणाऱ्या धुळीच्या प्रमाणात घट झाली. शहरातील व शहराबाहेरील छोटे-मोठे कारखाने बंद आहेत. शहरातले सर्वच बांधकामे बंद आहेत. या सर्व कारणांमुळे हवेतील धूळ आणि रासायनिक वायूंचे प्रमाण अतिशय कमी होऊन ऑक्सिजन चा स्तर वाढलाय आणि तो आपण प्रत्येकजण अनुभवू शकतो. ज्यांना श्वसनाशी संबंधित त्रास आहेत त्यांना हा फरक प्रकर्षाने जाणवत असेल. हवेचा शुद्धतेचा स्तर तर उंचावलाच आहे सोबत शाळा बंद असल्यामुळे मुलांचा बाहेरच्या हवेशी-धुळीशी संपर्क बंद आहे. दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे बाहेरचे खाद्यपदार्थ १००% बंद झालेत. भेळ-पाणीपुरी, चायनीज, हॉटेलातील जेवण, फास्टफूड, कोंड्रिंक्स-आईस्क्रीम, चॉकलेट आणि हवाबंद पाकिटातील चिप्स-कुरकुरे ह्या सर्व शरीराला गरज नसणाऱ्या , जिभेचे चोचले पुरवणाऱ्या अपायकारक गोष्टी दोन महिन्यांपासून पूर्णपणे बंद होऊन गेल्यात. आता घरातील वरण-भात, भाजीपोळी, मोड आलेले कडधान्य(उसळ), दूध, शिरा, पोहे, उपमा ह्या पौष्टीक आणि शुद्ध गोष्टी नाईलाजाने का होईना मुलांना खाव्या लागत आहेत. दुसरे पर्याय नाहीत. काही ठिकाणी मुलं नवनवीन पदार्थ बनवून मागत असतील तरी ते पदार्थ घरीच बनल्यामुळे बाहेरच्या खाद्यपदार्थांपेक्षा अनेकपट शुद्ध च आहेत. त्यामुळे पचनशक्ती सुधारली आहे. धुळरहीत शुद्ध हवा व पौष्टिक आहार यामुळे लहान-मोठ्यांच्या सर्वांच्याच रोगप्रतिकारक शक्तीत लक्षणीय वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ज्यांनी आयुष्यात कधीच व्यायाम केला नाही ते लोक सुद्धा वेळ जात नाही म्हणून नाईलाजाने का होईना थोडाफार योगा-प्राणायाम, व्यायाम करत आहेत. पुरेशी झोप घेत आहेत. वाचन करत आहेत. कुटुंबाला वेळ देत आहेत. जे दवाखाने बाराही महिने भरलेले असायचे, नंबर लावून दोन दोन तास थांबावं लागायचं तिथे आता अज्जिबात गर्दी दिसत नाही. १०-१५ लोकांमध्ये लग्न लागत असल्यामुळे लग्नकार्यात निष्कारण होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळल्या जातोय. तोच पैसा वधू-वरांच्या भविष्यासाठी कमी येतो. अशाच प्रकारे कुणी वारल्यानंतर १०-१५ माणसांमध्ये विधी आटोपून घ्यावा लागतोय. तेरवीचा कार्यक्रम रद्द केल्या जातोय. त्यामुळे आधीच मरणामुळे दुःखात असलेल्या कुटुंबाचा मोठ्या आर्थिक खर्चातून बचाव होतोय. हीच पद्धती लॉकडाऊन नंतर सुद्धा जपणे आवश्यक आहे. लॉकडाऊन काळात तंबाखू, घुटका, बिडी-सिगारेट, दारू मिळणे बंद झाल्यामुळे किंवा मिळणे कठीण झाल्यामुळे या व्यसनांशीवायसुद्धा आपण राहू शकतो, ह्या वाईट गोष्टी नसल्या तरी आपल्याला फरक पडला नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वृद्धिंगत झाला. घरखर्चात सुद्धा जो अनावश्यक खर्च होता, बाहेर हॉटेलिंगचा खर्च होता, विनाकारण फिरण्यामुळे पेट्रोल चा खर्च होता तो सुद्धा आपसूकच कमी झालेला दिसून येतो. ह्या सर्व गोष्टींची गरज होती का? कोरोना आधीसुद्धा ह्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या नसत्या का? आपल्या आयुष्यात काय कमी होत, आपण कुठे चुकत होतो हे कोरोनाने आपल्याला अवघ्या ६० दिवसात दाखवून दिलंय. बस ते यापुढे आपल्याला जपता आलं पाहिजे. यासाठी लॉकडाऊन संपल्यानंतरसुद्धा आपण उधळपट्टी न करता सध्या जशा कमी खर्चात भागत आहे तसे भागवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लग्न -मरण यात अनावश्यक खर्च टाळून कमीत-कमी लोकांमध्ये हे कार्यक्रम पार पाडायचे आहेत. वाहनांचा अनावश्यक वापर बंद करायचा आहे. बाहेरचे खाणे-पिणे, खाद्यपदार्थ शक्य तितके टाळायचे आहेत. पूर्णपणे सुटलेली किंवा कमी झालेली व्यसन पुन्हा सुरू करायची नाहीत. बाहेर निघतांना नाका-तोंडाला मास्क किंवा कपडा घालून निघायचं आहे. स्वतः साठी आणि कुटुंबासाठी वेळच नाही असं म्हणणाऱ्यांनी आपण खरंच इतके व्यस्त होतो का कि दिवसभरातून आपल्या कुटुंबासाठी एखाद तास, व्यायामासाठी २० मिनिटं, आपले छंद जोपासण्यासाठी ३० मिनिट पण वेळ काढू शकत नव्हतो? याचा विचार करण्याची गरज आहे. सध्या जी परिस्थिती जगात आहे ती आयुष्यात पुन्हा कधीच येऊ नये पण या आलेल्या संकटानेही आपल्याला जी शिकवणीची देणगी दिली आहे ती आपणही आयुष्यभर जपली पाहिजे. – चंद्रकांत झटाले , (अकोला) |
previous post
next post