पुणे : कोरोना अख्या जगाला वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवत असताना भारताने जागतिक दर्जाची लस निर्माण करून एक दिलासा दिला होता. या निर्मितीमध्ये लागणारा कच्चामाल हा अमेरिकेतून आयात केला जातो. अमेरिका लसीचा कच्चामाल निर्माण करणारा सर्वात मोठा देश असल्याने संपूर्ण लस निर्मिती ही त्यांच्या कच्च्या मालावर अवलंबून आहे. अशातच, अमेरीकेने घेतलेला एक निर्णय कोरोनाच्या लस निर्मिती आणि लसीकरणाच्या कार्यक्रमावर परिणाम करणारा ठरू शकतो. अमेरिकेने नुकताच लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयी जागतिक बँकेच्या एका चर्चासत्रात बोलताना सिरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा आदर पूनावाला यांनी आक्षेप नोंदवला. खरं तर, बायडेन प्रशासनाने अमेरिकेत लसीकरण कार्यक्रमास गती देण्यासाठी संरक्षण उत्पादन कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. यानंतर लस उत्पादक कंपन्या कच्च्या मालाच्या निर्यातीबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर बायडेन प्रशासनाशी चर्चा करण्याची गरज असल्याचे पूनावाला म्हणाले. पूनावाला म्हणाले की, तातडीच्या वापरासाठी भारताची लस मंजूर झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यांत सीरमने ॲस्ट्राझेनेका लसीचे 9 दशलक्ष डोस परदेशात पाठविले आहेत.भारताने जगभरात कोरोना लसीचे डोस पाठवले आहेत. प्रत्येक देशच एकमेकांना साथ देत या संकटातून मार्ग काढत असताना, अमेरिकेने घेतलेला हा निर्णय बरोबर नाही असे देखील त्यांनी सांगितले. ही बंदी ती जास्त काळ टिकून राहिली तर येणाऱ्या काही काळामध्ये लस निर्मिती कमी करावी लागेल, किंवा बंद करावी लागेल. अशी देखील वेळ येऊ शकते असेही मत त्यांनी नोंदवले. सिरम इन्स्टिट्यूट सध्या ‘नोव्हाव्हॅक्स’ नावाच्या कंपनीच्या लसीची निर्मिती करत आहे. या साठी लागणारे संसाधने देखील अमेरिकेतून मिळाले नाहीत तर मात्र, कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पर्यायाने लसीकरणाच्या कार्यक्रमावर पुढे जगभरात हाहाकार माजू शकतो.
previous post