मुंबई : केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी आणली आहे. सरकारने सांगितले की, 1 जुलै 2021 पासून पूर्ण महागाई भत्ता (DA) दिला जाणार आहे. सोबतच चालू वर्षीचा जो 3 वेळचा महागाई भत्ता थकलेला आहे तो देखील मिळणार आहे. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा थकलेला महागाई भत्ता जुलै 2021 मध्ये दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा केंद्राच्या 50 लाख कर्मचाऱ्यांबरोबर 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 असे तीन हप्ते रोखले होते. जेव्हा भविष्यात 1 जुलै 2021 च्या महागाई भत्त्यासाठी निर्णय घेतला जाईल, तेव्हा थकलेला 3 वेळचा भत्ताही दिला जाणार आहे. राज्यसभेत मंगळवारी एका लिखित उत्तरात अनुराग ठाकूर यांनी ही माहीती दिली आहे. तीन वेळचा महागाई भत्ता रोखल्याने सरकारचे 1.5 वर्षात जवळपास 37,530.08 कोटी रुपये वाचले होते. यामुळे कोरोनाकाळातील आर्थिक संकटाचा सामना करण्यास मदत मिळाली आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 17 टक्के महागाई भत्ता दिला जातो. या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढही केली जाते. सध्याचा भत्ता हा जुलै 2019 पासून लागू आहे. यामध्ये जानेवारी 2020 मध्ये वाढ करण्यात येणार होती. हा भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 21 टक्के करण्यास मंजुरीदेखील मिळाली होती. परंतू अद्याप तो लागू करण्यात आलेला नाही.