बुलडाणा : सध्या खरीप हंगामातील पेरणीची पूर्व तयारी शेतकरी बांधव करीत आहेत. शेतीसाठी लागणारे खत, बी बियाणे शेतकरी खरेदी करत आहेत. याचा गैरफायदा काही कृषी केंद्र मालक दरवर्षी घेत असतात. जिल्ह्यातील कृषी केंद्र धारकांना त्यांच्याकडे असलेल्या खताचे दर व त्यांच्याकडे असलेला साठा याची नोंद असलेला फलक कृषी केंद्राच्या दर्शनी भागात लावावा अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी दिल्या आहेत.
खरीप हंगामाचे दिवस जवळ आले आहे. बळीराजा कोरोनाच्या संकटकाळातही शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये व्यस्त आहे. यावर्षी दमदार पावसामुळे रब्बी हंगामात चांगले पीक आले, तसेच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकेही घेतली. पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. कुठलीही कमतरता पडू नये याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी २१ एप्रिल रोजीच खरीप आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
जिल्ह्यामध्ये यावर्षी ७, ३७,८५० हेक्टर जमिनीवर खरीप पेरणी होण्याची शक्यता असून याकरिता १७५६८० मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर असून आज पर्यंत प्रत्यक्षात ३५२९४ मेट्रिक टन खत मिळाले आहे, उर्वरित खत जुलै पर्यंत प्राप्त होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक खत मिळेल. तरी देखील काही कृषी केंद्र धारकांकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते. त्यामुळे कृषी केंद्र धारकांनी खताचे दर आणि उपलब्ध असलेला साठा याचा फलक कृषी केंद्राच्या दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे.जर शेतकऱ्यांकडून खतासाठी अतिरिक्त पैसे घेतल्यास संबधित कृषी धारकांवर कडक कारवाही करण्यात येईल असा इशाराही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
सौजन्य – जिमाका