हिवरखेड मधील मेंढपाळांच्या व्यथा
खामगाव : राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात असताना, बुलडाणा जिल्ह्यातील मेंढपाळ मात्र शासनाच्या सेवा सुविधांपासून दुरापास्त झाल्याचे दिसून येते. आमच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून कुणीच लक्ष दिलेले नाही असे मेंढपाळांचे म्हणणे आहे. कोणीच मेंढ्या विकत घेत नाहीये त्यामुळे आमच्या जेवणाचे देखील हाल झाले असून पावसाळ्यापूर्वी मेंढपाळांचा प्रश्न मार्गी न लागल्यास त्यांच्यासमोर आत्महत्येचा एकमेव पर्याय उरेल अशी दारुण व्यथा मेंढपाळांच्या आहेत. कोरोनामुळे सर्व उद्योग, सेवा क्षेत्रही बंद पडलेली आहेत. गरीब, कष्टकरी व सर्वसामान्य वर्गाला या लॉकडाऊनचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असून, त्यांचा उदरनिर्वाहच यानिमित्ताने धोक्यात आलेला आहे. यांसोबतच मेंढपाळ समुहाला सुद्धा लॉकडाऊन मुळे गंभीर संकटाला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सदर परिस्थितीवर लवकरात लवकर मार्ग काढल्या जावा अशा भावना हिवरखेड येथील मेंढपाळांनी व्यक्त केल्या आहेत. “आम्ही अनेक पिढ्यांपासून शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय करीत असून, हे संकट गंभीर आहे. या काळांत मेंढपाळांना अन्न धान्याची सक्षम व्यवस्था व कायम स्वरूपाची विमा योजना राबविने गरजेचे आहे” “लॉकडाऊनमुळे मेंढरांच्या खरेदी विक्रीवर विपरीत परिणाम होऊन, मेंढपाळांना आर्थिक फटका बसत आहे.” अश्या प्रतिक्रिया हीवरखेड येथील मेंढपाळांनी निर्भिड स्वराज्य शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.