January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ विविध लेख

काळ भयानक कठीण आलाय

आधी कोरोना पॉझिटीव्हच्या बातम्या यायच्या आता अनेक परिचित, नातेवाईकांच्या मृत्यूच्या बातम्या कानावर येवू लागल्या आहेत.काळजाचा थरकाप उडवणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत.
पैसेवाले खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. गरीबाला हॉस्पिटल,ऑक्सिजन, बेड मिळत नाही. माणूस मरतोय, त्याला परस्पर जाळलं जातंय…. स्मशानभूमीत नंबर लागलेत. प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिलं जात नाही. दहावा नाही ना तेरावा नाही. राख सुद्धा सावडायला मिळत नाही. एक पेशंट सापडला की सगळं घर कोरोना पॉझिटिव्ह होतंय. कितीही काळजी घेतली तरी संसर्ग न होणं आता माणसाच्या हातात राहिलेलं नाही. कितीही खबरदारी घेतली तरी कोरोना होणार नाही याची शाश्वती उरलेली नाही. कहर माजलाय. घराभोवतीने वणवा लागावा अन आपलं घर वणव्याची वाट बघत तटस्थ उभं असावं अशी परिस्थिती निर्माण झालीय. जीवावर उदार होवून पोटापाण्यासाठी बाहेर पडायचं. कोरोनाची धास्ती घेऊन माघारी घरी यायचं. सगळं कुटुंब दगावण्याची भीती काळजात कळ मारत राहतेय. आधी कोरोना शहरा शहरात सापडायचा, आता वार्डा वार्डात सापडतोय. खेडोपाडी, वाड्या वस्त्यावरची माणसं उचलून दवाखान्यात भरती केली जात आहेत. मेलेला माणूस घरापर्यंत येत नाही, शिल्लक माणसांना चौदा दिवसाचा वनवास पदरी येतोय. कोरोना ग्रस्त सापडला तरी आता त्याला घरातच डांबून ठेवलं जातंय. उपचार नाहीत, औषधे नाहीत. जगला तर जगला, मेला तर मेला. सगळीकडे सगळ्याचाच तुटवडा आहे. आभाळ फाटलंय, ठिगळं लावायला जागा उरली नाही. बिकट परिस्थिती आहे. ज्याचं जळतंय त्यालाच फक्त कळतंय. बाकीचे सगळे खुशाल आहेत, गाफील आहेत. जात्यासाठी आपला अजून नंबर आलेला नाही, या मिथ्या समाधानात सुपातले मश्गूल आहेत. कुणाचे सांत्वन करायचे, कुणाला धीर द्यायचा..? अजून मेलो नाही म्हणून जिवंत आहे, असे म्हणायची वेळ आलेली आहे. गावाकडे आईवडील रामभरोसे आहेत. वाईट बातमी येवू नये म्हणून रोज त्या नसलेल्या देवाचा धावा करायचा. पहाटे पहाटे मोबाईल खणखणू नये म्हणून त्या संकल्पनेतील विधात्याची करुणा भाकायची. जणू फिल्टर लावलाय. रोगीष्ट, आजारी, गळून गेलेले, पिकून गळून पडायला आलेले, ब्लड प्रेशर, शुगरने पोखरलेले या तडाख्यात सापडले की पुन्हा उठत नाहीत. तारुण्य, प्रतिकारशक्ती, धडधाकट प्रकृती, सगळ्या गैरसमजूती आहेत. कोरोनाच्या तुम्ही नजरेत भरला की कोरोना तुम्हाला उचलून नेणार!!!! कसला निकष नाही की कसला क्रायटेरिया नाही. जगतील ते जगतील, मरतील ते मरतील, सरधोपट गणित आहे, कसलंही लॉजिक नाही. काळजी घ्या, नका घेऊ. तुमच्या हातात तुमचं जगणं उरलेलं नाही. वणवा विझवायला आगीचे बंब पाठवण्याऐवजी आम्ही रॉकेल भरलेले टँकर पाठवतोय. सगळंच अनलॉक करुन ठेवलंय, जणू मृत्यूचं श्वापदच खुलं केलंय. आम्ही मृत्यू अनलॉक केलाय. घराबाहेर कुणी सुरक्षित नाही, काही दिवसातच घर पण असुरक्षित होतील. मृत्यू चुकवणं अवघड होऊन जाईल. सगळंच बेभरोसे होईल. मेलो नाहीच तर जिवंत राहू…म्हणून अजुनही वेळ गेलेली नाही! सावध व्हा! आपणास डायबेटीस, बीपी, कँसर, किडनीचे आजार असतील तर घरातच रहा! गर्दीत, लग्नात, मयतीस, दहाव्यास जाणे टाळा. अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. तोंडाला रुमाल किंवा मास्क लावा…

नियम पाळा! लस येईपर्यंत….!!

साभार: सोशल मीडिया

Related posts

जलंब सरपंचांनी कमिशनरूपी भ्रष्टाचाराच्या पैशातून केलेल्या कामाची चौकशी करावी…

nirbhid swarajya

बाजार समितीतील संभाव्य प्रशासकांची यादी जाहीर

nirbhid swarajya

एकनाथ दौंड यांची दुग्ध व्यवसायातून समृद्धी

nirbhid swarajya
error: Content is protected !!