जून पुर्वी कापूस लागवड न करण्याचे कृषी विभागाचे होते निर्देश
खरीप आढावा बैठकीत आमदार आकाश फुंडकर यांनी शेतक-यांसाठी विविध मागण्या केल्या
खामगांव : आज कृषी विभागाची पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांच्या अध्यक्षेतखाली खरीप हंगामपुर्व नियोजन बैठक पार पडली या बैठकीत खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी कृषी विभागाने कापूस लागवडीवर काही बंधने घातली त्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाईक यांना जाब विचारत शेतक-यांवर कापूस लागवडीवर बंधने आणू नये अशी मागणी केली. या खरीप हंगामपुर्व नियोजन बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कापूस लागवड करण्याबाबत शेतक-यांनी जून पुर्वी कापूस लागवड करु नये असे निर्देश दिल्याचे सांगितले. यावर आमदार आकाश फुंडकर यांनी शेतक-यांवर कृषी विभाग बंधने का आणते ? शेतक-यांना त्यांच्या इच्छे प्रमाणे कापूस पेरणी करु द्यावी. कृषी विभागाच्या म्हणण्याप्रमाणे जून मध्ये कापूस पेरणी केल्यास त्यावर बोंड अळी येते. परंतु जून नंतर पेरणी केल्यास बोंड अळी येणार नाही याची शाश्वती कृषी विभाग देते काय ? यावर जिल्हा अधिक्षक निरुत्तर होते. त्यामुळे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी शेतक-यांना त्यांच्य मर्जी प्रमाणे कापूस लागवड करण्याची मुभा द्यावी अशी मागणी लावून धरली. यासोबतच या वर्षी सोयाबीन सोयाबीनच्या बियाण्याच्या तुटवडयाची शक्यता आहे. शेतक-याकडे सोयाबीनचे घरचे बियाणे नाही गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे सोयाबीन हातचे गेले होते. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यावर्षी सोयाबीनचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन सोयाबीन बियाण्याचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ आढावा घेऊन सर्व तालुक्यांना सोयाबीन बियाण्याचा साठा नियमीत करुन द्यावा. महाबीजचे बियाणे किती प्रमाणात पुरवठा करणार त्याप्रमाणे त्यांना मागणी करण्यात यावी व बियाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा. बोगस बियाणे आढळल्यास कृषी विभाग हा कृषी केंद्रावर कारवाई करतो. परंतु वास्तविक पाहता ज्या कंपन्यांचे बियाणे बोगस निघते त्या कंपन्यांवर कारवाई अपेक्षीत आहे. त्यामुळे बोगस बियाणे तयार करणा-या कंपन्यावरच कारवाई करण्यात यावी. तसेच जी कृषी केंद्र हे खोटया कंपनीचे बियाणे विकत असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी जेणेकरुन शेतक-यांवर अन्याय होईल. खतांच्या विक्रीबाबत देखील अनेक कृषी केंद्र हे महाग खतांची विक्री आधी करतात व स्वस्त खतां साठा बाहेर काढत नाही. त्यामुळे शेतक-यांना नाईलाजास्तव महाग खते विकत घ्यावी लागतात. त्यामुळे सर्व कृषी केंद्रांना स्वस्त खते देखील बाजारात उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात यावे. यासोबतच ज्या शेतक-यांनी कृषी पंपासाठी अर्ज केले त्यांना अंदाजपत्रक देण्यात येऊन त्यांच्याकडून रक्कमेचा भरणा करुन त्यांना कृषी पंप कनेक्शन देण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी या बैठकीत पालकमंत्री महोदयाकडे केली.