खामगाव प्रतिनिधी: तालुक्यांतील बोरी अडगाव येथील कलाबाई मल्टीपरपज फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते रामकृष्ण गजाननराव पाटील ( वय ५६) यांचे ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, तीन बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता राहते घर बोरी अडगाव येथे ठेवण्यात आला आहे. खामगाव पंचायत समितीचे माजी सभापती स्व. भैय्याभाऊ पाटील यांचे ते पुतणे होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाचे दालन खुले करण्यासाठी तसेच दर्जेदार शिक्षण देण्यासाठी रामकृष्ण पाटील यांनी स्व. कृष्णराव रामजी पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. राजकीय जीवनात त्यांनी कधीही पदाची लालसा केली नाही.राजकारण करत असताना त्यांनी अनेक शासकीय योजनांचा गरीब व गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला. निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणुन रामकृष्ण पाटील यांची सर्वदूर ओळख आहे. सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचें घनिष्ठ संबंध होते.