मुलगी, आई, बहीण, आजी, बायको या प्रत्येक शब्दाचा अर्थ फिरून फिरून परत महिला किंवा स्त्री, नारी असाच होतो. अनेक पुस्तके, ऑनलाइन साईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तपत्र, ब्लॉग अशा प्रत्येक ठिकाणी महिलांबद्दल भरभरून लिहिले जाते. आज आपण एकविसाव्या शतकात आहोत, परंतु तरीही महिलेबद्दल प्रत्येकाला समजून सांगावे लागतेच. सोशल मीडियावर लिहिलेले आर्टिकल किंवा ब्लॉग याला खूप लाइक्स, कमेंट्स लोक देतात. परंतु प्रत्यक्षात त्याचे अनुकरण करायची वेळ येते तेव्हा कोणीही त्याचे अनुकरण करत नाही. आजची स्त्री ही गायिका, लेखिका, प्रायव्हेट जॉब, पायलेट इतकेच नाही तर अंतराळात देखील जाऊन पोचलेली आहे. आता तर अनेक ठिकाणी महिला रिक्षा देखील चालवताना दिसतात. त्यांना बघून तर खरोखरच अभिमान वाटतो… याच वरून समजते छोट्यातील छोटा कामापासून मोठ्या कामापर्यंत सर्व कामे महिला करू शकते. इतकंच नव्हे तर घरातील काम, मुलं, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून महिला बाहेरील काम देखील चौखरित्या पार पाडतात. परंतु पुरुषांचे मात्र बहुधा तसे नसते. बहुतेक पुरुष हे घरातील काम करणं तर दूरच पण घरातील मुलीला नावं ठेवण्यात अव्वल असतात. आज महिला प्रत्येक स्तरावर पोहोचलेली असून सुद्धा तिला अजूनही दुजा भाव दिला जातो. म्हणूनच या विषयावर लिहायचे मुद्दामच ठरवले, कारण अनेक ठिकाणी अप्रत्यक्षरित्या का होईना माझ्या असे निदर्शनास आले की, अनेक पुरुष मंडळी मुलींना, महिलांना अजूनही कमी दर्जाचे लेखतात. तू मुलगी आहेस ना… तू जास्त बोलायचे नाही… कमी बोलायचं… तुझे मत तुझ्या जवळ ठेव… एक मुलगी आहे तू… किती फिरत असते… असे अनेक ठिकाणी बोलले जाते.
काही कुटुंबात तर मुलगी झाली म्हणजे आम्ही खूप नशीबवान आहोत, पहिली मुलगी धनाची पेटी वगैरे – वगैरे… असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवतात आणि तीच मंडळी दुसऱ्या कर्तबगार मुलींना, स्त्रियांना कमी लेखतात. इतकेच काय तर हे प्रत्यक्ष माझ्या बाबतीत देखील खूप वेळा घडले आहे. मला देखील अनेक पुरुष मंडळीं म्हणतात किती बोलतेस…. पण यावेळेस मी माझं मत ठाम ठेवून त्यांना स्त्री आणि पुरूष वेगळे नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. पण काही पुरुष हे इतके हट्टी असतात का त्यांना एखादी मुलगी आपल्याला इतके समजवते त्यात पण त्यांना कमीपणा वाटतो. आणि सर्व समजवल्यानतंर ती गोष्ट चुकीची असली तरीदेखील ते लोक त्या गोष्टीलाच साथ देतात. पुढे जाऊन अश्या पुरुषाचं काय होणार देव च जाणे… आणि यात फक्त पुरुषच नाही तर अनेक महिला देखील असे वागताना दिसतात. परंतु या सर्व कुटुंबातील व्यक्तींना मला विचारावेसे वाटते जर तुम्ही इतर मुलींना म्हणतात मुलगी आहे, जास्त बोलू नको… तर तुम्ही स्वतः च्या मुलींवर काय संस्कार करणार ? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे येथे म्हटले जाते. किंबहुना या समाजात अनेक महापुरुष स्त्रीमुळेच घडले. राजमाता जिजाऊ होत्या, म्हणून संस्कारमूर्ती व कीर्तिवंत छत्रपती शिवराय घडले. सावित्रीबाई फुलेंची साथ होती, म्हणून जोतिबा फुले महात्मा झाले. आम्ही मुलीहून स्त्री होतो. प्रेयसीहून बायको होतो. माहेरवासीनहून सासूरवासीन होतो. पत्नीहून आई होतो. आईहून सासू होतो. सासूहून आजी होतो. पण एक माणूस म्हणून जगायला आपल्या सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो. आजच्या फॉरवर्ड विचारांच्या समाजातही हे घडत आहे. मुळात ‘शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरी’ या म्हणीनुसार हे फॉरवर्ड विचारही केवळ बोलण्यापुरतेच मर्यादित आहेत. प्रत्यक्षात हे विचार अंमलात आणण्यात आपण बरेच पिछाडीवर आहोत. महिला आणि पुरुष हे शरिर रचनेने दोन वेगळे घटक आहेत. हे नैसर्गिक सत्य बाजूला ठेवले तर दुसरे कोणतेही कारण महिला आणि पुरुष असा भेदाभेद करायला योग्य ठरत नाही. पण सतत हा भेदाभेद करायला कारणं निर्माण करण्यात आली आहेत आणि सगळ्यात आधी याचा बळी ठरतात ती म्हणजे घरगुती बाई. घरातली स्त्री जी नोकरी करत नाही वा व्यवसाय करत नाही तिचा जन्म केवळ घरातल्या कामांसाठीच झालाय की काय अशा अर्थाची वागणूक आजही बऱ्याच घरात ‘हाऊसवाईफ’ला मिळते. जे अत्यंत चुकीचे आहे. ज्या व्यक्ती आपल्या घरातील आई, बहीण, बायको, मुलगी, मेहुणी, सासू त्यांचा आदर करत नाहीत… त्यांना कमी लेखतात अश्या व्यक्तींना काय म्हणावं हा प्रश्न आता मलाच पडला आहे. परंतु मी इतकेच सांगेल बाहेरील जगात जो आपल्या मान मिळतो तोच घरातील महिलेला देखील द्या. घरातील प्रत्येक स्त्री चा आदर करा, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना कमी लेखू नका कारण एका स्त्रीनेच तुम्हाला जन्म दिला आहे हे विसरू नका. स्त्री आहे म्हणून आज प्रत्येक व्यक्ती ही जगात वावरताना दिसते. जेव्हा हा स्त्री आणि पुरूष मधील भेदभाव संपेल तेव्हाच खऱ्या अर्थाने माणूस हा सुशिक्षित ठरेल.
गायञी सरला दिनेश घुगे