प्रशासनाने केली भोजन व्यवस्था
(निर्भिड स्वराज्य टीम) खामगाव : कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संकटाच्या काळात कंपन्या, कंत्राटदारांनी माणुसकी दाखवून त्यांच्याकडील कामगारांच्या पोटापाण्याची सोय करावी असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवठाकरे दररोज करत आहेत. मात्र त्यांच्या आवाहनाला दुर्लक्षित केल्याचे बुलडाणा जिल्ह्यात दिसुन येत असल्याचे संतापजनक चित्र बघायला मिळत आहे. शहरात रोजगारासाठी परराज्यातून आलेल्या कामगारांना कंपन्या, कंत्राटदार यांना वाऱ्यावर सोडून दिलेआहे. घराकडे जाण्यासाठी काहीच वाहन मिळत नसल्यामुळे या कामगारांनी पायीच दर कोस दर मुक्काम करीत घराकडची वाट धरली आहे.
बुलडाण्यासह संपूर्ण विदर्भात पोट भरण्यासाठी आलेल्या परप्रांतियांची संख्या हजारोंच्या घरात आहे. दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी हे लोक भेटेल ते काम करतात. कंपन्यामध्ये रोजंदारीवर काम करणारे शेकडो परप्रांतीय आहेत. काही कंपन्या तर या कामगारांचीराहण्या, खाण्याचीही सोय करतात. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. जिल्हाबंदी, राज्यबंदी करण्यात आली. वाहतूक थांबवण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका या परप्रांतीय कामगारांना बसला.रोजंदारी बंद झाली. कंपन्या, कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडले आहे. घरी जाण्यासाठी काही साधन नाही.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यात येणाऱ्या चितोड़ा या गावात आवादा सोलर कंपनी चे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु आहे,या प्रकल्पावर उत्तर प्रदेश मधुन ४० ते ५० मजुर येथे गेल्या ६ ते ७ महिन्यांपासुन काम करत होते,व त्यांची कुठल्याही प्रकारची जेवणाची व्यवस्था कंत्राटदाराकडून होत नव्हती यांची माहिती उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त झाली. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी लगेचच ठोस पावले उचलून अन्नदान करणाऱ्या सामाजिक संस्थेशी बोलणे करुन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली व स्वतः त्या गावात जाऊन त्या मजुरांनाना जेवणाचे पाकिट वाटप केले. त्यांच्या कंत्राटदाराला त्यांची जेवणाची व्यवस्था करावी असे सुद्धा सांगितले आणि सोबतच त्यांनी आपल्या गावाला जाण्याची घाई करू नये व आपली काळजी घ्यावी व प्रशासन आपल्या सोबत आहे असे सुद्धा सांगितले.
तेथील काही तरुणांनी सांगितले की दोन दिवसांपासून त्यांच्या खाण्याचे हाल होत आहेत व ज्यांच्याकडे काम करत होतो त्यांनी पाठ फिरवली त्यामुळे आता घराकडे जाण्याशिवाय कोणताच पर्याय आमच्या कडे उरला नाही असेही त्या तरुणांनी सांगितले. यावेळी तहसिलदार शितल रसाळ, मंडळ अधिकारी विजय कुलकर्णी, सचिन ठाकरे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.