शेगाव : औद्योगिक विकासाच्या माध्यमातून मागासले पण दूर करू असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या औद्योगिक सेलचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनारे यांनी केले. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना शेगाव येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग अंतर्गत आयोजित चर्चासत्र व पत्रकार परिषदेत स्थानिक नवउद्योजक व पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते तथा माऊली ग्रुप चे चेअरमन श्री ज्ञानेश्वर दादा पाटील, तसेच शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय उर्फ किरण बापू देशमुख, बसंत शर्मा, धनंजय लांडे, रविकांत बोंबटकार जितेंद्र पाटील यांचे सह इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध साधन संपत्तीचा औद्योगिक विकासाच्या दृष्टीने विचार करून विविध उपक्रम राबविण्याकरिता जिल्हा पातळीवर औद्योगिक सेल स्थापन करून ग्रामीण भागातील लघु उद्योगांना चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या सेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा पातळीवरील स्थापन औद्योगिक सेलच्या माध्यमातून इच्छुकांनी या विकास कार्यात आपले योगदान द्यावं असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारण्याकरिता सकारात्मक दृष्टीने विचार करावा. परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून विकास साधता येऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतमाल प्रक्रिया उद्योग, लघु व मध्यम उद्योगांना शासनाच्या विविध योजनांचा पाठबळ मिळून देण्याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अभियांत्रिकी, औद्योगिक शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, कार्यरत युवक, शेतकरी यांना विकासात्मक संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याकरिता सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देऊन त्यांनी निसंकोचपणे संपर्क साधावा असे आवाहन श्री ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
याप्रसंगी आयोजित सभेत माऊली ग्रुपचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. तुषार बढे यांची जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी एका पत्रकाद्वारे नियुक्ती केली. तसेच मायक्रोस्पेक्ट्रा टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर श्री विजय ताठे, महिला सक्षमीकरणाकरिता बचत गटांच्या माध्यमातून कार्य करकरणाऱ्या सौ. योगिता खोंड, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत प्रा. धीरज पाचपोर यांना जिल्हा औद्योगिक सेलच्या सदस्य पदाची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आले. माऊली ग्रुपच्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून परिसराच्या औद्योगिक विकासाकरिता सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही डॉ. सोनारे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अधीक्षक श्री संदीप कराळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. तुषार बढे, प्रा. पियुष डोरले, प्रा. धीरज पाचपोर, सतीश गायकवाड, देविदास पुंडगे, योगेश काळे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अकोला अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर मुंबई मेहकर मोताळा राजकीय शेगांव संग्रामपूर