खामगांव : कोरोनाचा प्रादुर्भाव जगासह संपुर्ण महाराष्ट्रा मधे वेगाने वाढताना दिसून येत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या नियमानुसार गणपतीची स्थापना साध्या पद्धतीत बसवण्यात आले आहे. गणपती पाठोपाठ गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन होते, मंगळवार दुपारपासूनच महालक्ष्मीची आरास सजविण्यात महिला मग्न होतात. महालक्ष्मीचा सण तीन दिवस असतो. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांची मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन म्हणतात. उद्या ज्येष्ठा गौरींचं घरोघरी आगमन होत आहे. गौरी किंवा महालक्ष्मी बसवण्याचे प्रकार आणि पद्धत वेगवेगळी असली, तरी त्यात उत्साह मात्र सारखाच असतो.गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस. गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते. या निमित्त बाजारपेठ सजली असून, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी बाजारात आहे. विशेष करून ऐन महालक्ष्मीच्या सणासुदीत फुलांच्या किंमतीं वाढल्या असून, केवड्याच्या पानाचे महत्व असल्याने त्याची किंमत वाढली आहे. निशिगंध, जाई-जुई तसेच लिली, झेंडू फुलांचे हार देखील शंभररूपयांपेक्षा जास्त किंमतीत विक्री होत आहेत.महालक्ष्मीच्या आगमना निमित्त घरोघरी सडा-रांगोळी काढून स्वागताची तयारी करण्यात येते.बुधवारी महालक्ष्मीचे महाभोजन असल्याने अनेकांनी तयार मिठाईसह बाजारात आलेल्या १६ भाज्या खरेदी केल्या आहेत. काही जणांकडे सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशा तिन्ही प्रहारात महालक्ष्मीच्या जेवणाची परंपरा आहे. गणेश उत्सवातच येणारा हा सण देखील दसरा-दिवाळी एवढा महत्वाचा समजला जातो.