खामगांव : उत्तर प्रदेश मधील युवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती जिल्हा अध्यक्ष अॅड.मीरा बावस्कर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.यांनी दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील दलित समाजाच्या मुलीवर 14 सप्टेंबर 2020 रोजी सामूहिक अत्याचार करून तिची जीभ कापून, मानेचा मणका मोडून,व पाय निकामी करून तिला पूर्णपणे अपंग केले होते. मात्र 29 सप्टेंबर रोजी उपचार घेत असताना त्या पीडित तरुणीचा करुण अंत झाला.अशा घृणास्पद घटनेची तेथील प्रशासनाने ताबडतोब दखल घेणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही.
आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय याचे प्रमाण वाढत आहे,ही प्रमुख परिस्थिती लक्षात घेता अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी व माणुसकीच्या नावावर कलंक असणाऱ्यां नराधमांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण या झालेल्या घटनेची तातडीने दखल घेऊन जलद गतीने न्यायालयीन कारवाई करून सुनावणी करावी,तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. जेणे करून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल. तसेच देशातील इतरही महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे जलद गतीने चालवून त्यांनासुद्धा लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हा युवती अध्यक्ष अॅड.मीरा बावस्कर यांनी निवेदनात केली आहे.