बुलडाणा : कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच धार्मिक स्थळांना लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये हे लक्षात घेऊन सर्वच धर्मीय आपापले सण साध्या पद्धतीने साजरे करीत आहे. सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून काही दिवसानंतर रमजान ईद आहे. कोरोनामुळे यावर्षीची ईद कशी साजरी करावी याबद्दल बुलडाण्यात मुस्लिम समाजाचे काही युवक गल्ली बोळ्यांमध्ये जाऊन लाऊडस्पीकरने यावर्षीची रमजान ईद साधेपणाने साजरी करावी, बाजारात नवीन कपडे खरेदीसाठी जात आहात तर फिजीकल डिस्टनसिंग पाळाव, जास्त करून यावर्षी नवीन कापडाची खरेदी करू नये. जे पैसे कपड्याची खरेदीसाठी करण्यासाठी ठेवले आहेत त्या पैश्यांनी गरीबांना मदत करा, कोरोनामुळे देशातील सर्वच समाजाने आपापले सण सर्व – साधारणपणे साजरे केले आहेत, तशा पद्धतीने आपणही सर्वसाधरणपणे ईद सण साजरा करू असे आवाहन ते करीत आहेत तर त्यांच्या या आवाहनाला शहरातील नागरिकांकडून प्रतिसाद देखील पहावयास मिळत आहे.
लॉकडाऊन ४ मध्ये शर्ती अटींवर बुलडाणा शहरातील सर्वच दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत उघडण्याची मुभा दिलेली असून ही मुस्लिम समाज काही खरेदीसाठी बाजारात व विशेष म्हणजे कपड्याच्या दुकानात गर्दी करतांना दिसत नाही आहेत, यामुळे बुलडाण्यातील मोहम्मद अजहर, बबलू कुरेशी, मोहम्मद दानिश, अबूझर, अल्ताफ खान, समीर चौधरी या युवकांनी मुस्लिम नागरिकांना केलेले आवाहन खरच कौतुकास्पद असून गरीबांसाठी आणि कोरोनाच्या लढाईत एक मोठं योगदान ठरणार आहे.