खामगाव : वडीलांची भेट घेवून घरी परतणाऱ्या २३ वर्षीय युवकाचा आयशर ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. येथील खामगाव अर्बन बँकेचे प्रबंध संचालक अरूण दुधाट रा.डिपी रोड यांचा मुलगा निनाद (२३) हा पुणे येथे इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण करून पुण्यामधेच युपीएससीची तयारी करत होता. दरम्यान युपीएससीचा कोर्स पुर्ण करून काल खाजगी वाहनाने पुण्यावरून खामगाव येथे आला होता.येथे त्याने वडीलांच्या डिपी रोडवरील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमधील फ्लॅटवर त्याचे साहित्य ठेवून आज सकाळी तो दुचाकी क्रमांक एमएच २७ एएम ४८६१ ने घरी अमरावतीकडे निघाला. खामगांव-अकोला रोडवरील सुदर्शन ढाब्याजवळ समोरून येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एमएच ४० बीजी ७०९८ ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात निनाद दुधाट हा जागीच ठार झाला. अपघातानंतर सदर ट्रकने सुदर्शन ढाब्या पासुन अपघातातील दुचाकी ही 4 किमी पर्यंत घासत आणली होती.चालक हा घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न करीत असतांना टेंभुर्णा येथील काही युवकांनी त्याच पाठलाग करून त्याला टेंभुर्णा फाट्यानजीक पकडले व ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खामगाव अर्बन बँकेचे विधी अधिकारी श्रीकांत तुकाराम निखाडे (५०) रा. समन्वय नगयांच्या तक्रारीवरून उपरोक्त आयशर ट्रकच्या चालकाविरूध्द कलम २७९, ३०४ अ, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. निनादच्या अपघाती निधनामुळे दुधाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा मृतदेह अॅम्ब्युलन्सने अमरावती येथे नेण्यात आला असून तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
previous post