आदिवासी बहुल भिंगारा गावात विश्व आदिवासी दिवस साजरा
बुलडाणा : जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. या समाज बांधवांच्या प्रलंबित असलेले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतीपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले. जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथे विश्व आदिवासी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते.9 ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र द्वारा घोषित करण्यात आला आहे. हा दिवस जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत अतिशय दुर्गम भागात वसलेल्या भिंगारा या गावात भिलाला, बारेला, पावजाती भिंलारा या आदिवासी जमतीकडून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून या समाजाच्या वतीने दरवर्षी विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने कोरोना सुरक्षेचे नियम पाळून सामाजिक अंतर राखत मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, भीमराव पाटील, डॉ दाभाडे होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, याठिकाणी असलेल्या आदिवासी समाजाचे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे. यामध्ये प्रामुख्याने जमिनीचे पट्टे वाटप असेल, जात प्रमाणपत्राचा विषय असेल किंवा सर्वात महत्वाचा येथे राहणाऱ्या लोकांना मूलभूत सुविधा अशा सर्व प्रश्नांकरिता लवकरच संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येतील. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला आदिवासी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाला आदिवासी बांधवाकडून सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करण्यात आले.