रुग्णालयातून मिळाली सुट्टी
बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय चिमुकली मुंबई येथे कोरोना बाधित झाली. तिच्यावर मुंबईत एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून मलकापूर पांग्रा येथे दाखल होताच या चिमुकलीला बुलडाणा येथे कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले. या चिमुकलीने कोरोनाशी चिवट झुंज देत कोरोनावर मात केली. तिची आज कोवीड केअर सेंटर येथून सुट्टी करण्यात आली. त्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यात सध्यातरी कोरोना हद्दपार झाला आहे. जिल्ह्यात एकूण ३६ कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी आज पर्यंत २५ रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर येथील चार, खामगाव तालुक्यातील दोन, शेगाव येथील तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील 2, देऊळगाव राजा येथील दोन, चिखली येथील तीन, बुलढाणा येथील ८ व जळगाव जामोद येथील एक अशाप्रकारे २५ रुग्णांचा समावेश आहे. तसेच तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मलकापूर पांग्रा येथील चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. यावेळी डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी चिमुकलीचे टाळ्या वाजवून स्वागत केले. चिमुकलीला मोठ्या आनंदाने निरोप देण्यात आला. शासनाच्या रुग्णवाहिकेतून मलकापूर पांग्रा येथे घरी सोडण्यात आले. यावेळी चिमुकलीच्या पालकांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या काळजीबद्दल आभार व्यक्त केले.
सौजन्य – (जिमाका) :