सरंपचांच्या अध्यक्षतेखाली असणार समिती
खामगांव : शासन निर्णयान्वये वाळु निर्गती धोरण निश्चित करण्यात आले असून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम दक्षता समिती गठीत करण्याबाबत निर्देश दिले आहे. ज्या गावामध्ये वाळू गट किंवा वाळू साठे असतील अशा ग्रामपंचायतीमध्ये ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात येत आहे. सदर समितीमध्ये अध्यक्ष सरपंच राहणार असून तलाठी सदस्य सचिव असणार आहे. तसेच ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल हे सदस्य असणार आहे.या समितीने दर १५ दिवसांनी बैठकीचे आयोजन करून वाळूचे अवैध उत्खनन, वाहतूक होत असल्यास त्याला आळा घालण्यासाठी ग्रामदक्षता समितीने त्यांच्या शिफारसी संबंधीत तहसिलदारांकडे कराव्यात. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, वाहतूकीवर आळा घालण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी कार्यवाही करावी. जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीपात्रांमधून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये हा प्रकार सुरू असेल अशा ग्रामपंचायतींच्या ग्राम दक्षता समितीस अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस जबाबदार धरण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीतून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक होत असेल, तर अशा ग्रामपंचायतींच्या संबंधित सरपंचास जबाबदार धरून त्यांचेविरूद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १४,३९अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित पोलीस पाटील विरूद्ध महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मधील कलम ९ अन्वये कारवाई करण्यात येईल. ग्राम दक्षता समितीच्या इतर सदस्याविरूद्ध शासन परिपत्रक १४ जुन २०१७ नुसार जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी कळविले आहे.