नांदुरा : नांदुरा येथील एका लायसन्स धारक देशी व विदेशी दारूच्या दुकानामध्ये अवैध दारू साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून २ एप्रिल रोजी या दुकानावर पथकाने धाड टाकून दहा लाखाच्या जवळपास मुद्देमाल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाई वर्ग केली मात्र या विभागाने सदर दारूचा साठा अवैध नसल्याचा खुलासा केल्याने या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राजेश मियाणी यांच्या बियर शॉप, देशी दारू, वाईन शॉप या प्रतिष्ठानावर १ एप्रिल ला रात्री मलकापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांनी कारवाई करत दुकानाला सिल ठोकले होते. या दुकानात अनधिकृत साठा असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली होती. देशी दारु दुकानाच्या बाजुला असलेल्या रुम मध्ये टॅंगो देशी दारू १८० एम.एल चे २५४ बाॅक्स, टॅंगो ९० एम.एल.चे १७३ बाॅक्स एकुण ४१४ बाॅक्स किंमत ९ लाख ९३ हजार सहाशे रुपये सापडला. रात्री नऊ वाजता दुकानाला सिल ठोकून, दुकानातील माल व प्रकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. २ एप्रिल रोजी सकाळी दुकानाचे सिल उघडून, प्रतिष्ठानातील माल हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच या दुकानातील साठा अधिकृत,वैध किंवा अवैध तसेच निर्धारीत क्षमतेपेक्षा जास्त आहे का ? याबाबत कारवाई करून अहवाल देण्यात यावा,अशी लेखी सुचना मलकापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांच्याकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्याने ०२ एप्रिल रोजी बुलडाणा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दिपक शेवाळे , मलकापूर राज्यउत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एस.जी.गायकर,ब.रा.बर्डे व त्यांचे पथक संबंधित प्रतिष्ठानात दाखल झाले मात्र दारूचा साठा अवैध नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.