जिल्ह्यात 35 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान
बुलडाणा : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पाउस व गारपीटीने शेतक-यांना रडकुंडीला आणले आहे. हातात आलेले सुमारे 34 हजार 808 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पीक उद्ध्वस्त झाले आहे.अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुके गारपिटग्रस्त झाल्याने नुकसान भरपाईची मागणी जोर धरु लागली आहे. काल 17 मार्चला सायंकाळी अवकाळी पावसाने जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. जिल्ह्यात 8 तालुक्यातील 296 गावात जोरदार वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून यात नुकसान झालेल्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.चिखली,मोताळा,मलकापुर, खामगांव, नांदुरा, जळगांव जामोद,संग्रामपुर व सिंदखेड राजा या आठ तालुक्यात अवकाळी पावसामुळे गहू, मका,हरभरा आदी रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मोठमोठ्या आकारांतील गारपिटींमुळे काही ठिकाणी चहूबाजूंनी पांढरी चादर अंथरल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला असून आज 18 मार्चला बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड व स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तूपकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नुकसान ग्रस्त भागांची पाहणी केली. दरम्यान शासनाने तात्काळ पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.