बुलडाणा : अन्न व्यावसायिक व वितरकांनी कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांचे उत्पादन, विक्री व वितरण करताना पोलीस यंत्रणा व शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सर्व सामान्य जनतेला त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही, तसेच ते राहत असलेल्या परिसरातील दुकानातून त्यांना खरेदी करता येईल, याबाबत दक्षता घ्यावी. अन्न पदार्थ व औषध विक्री करताना सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
नागपूर येथे लॉकडाऊनच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील अन्न पदार्थ उत्पादक, बेबीफड उत्पादक, पॅक फुड उत्पादक व वितरक, नमकीन उत्पादक यांच्या बैठकीचे सोशल डिस्टीसिंगचे पालन करीत २४ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं. भा पवार, सह आयुक्त(औषधे) पी. एन शेंडे, सहाय्यक आयुक्त अ. प्र देशपांडे, सहाय्यक आयुक्त पी.एम बल्लाळ, हल्दीराम, अजित बेकरी, दाल मिल असोसिएशन, किराणा असोसिएशन, नागपूर जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशन व व्हीडीएमए चे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना दर्जेदार व योग्य भावात अन्न पदार्थ उपलब्ध होतील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, रस्त्यावरील विक्री होणाऱ्या मास्कच्या बाबत योग्य ती कारवाई करण्याचत येईल. वापरलेल्या मास्कच्या विल्हेवाटीबाबत मनपा आयुक्त यांना कळविण्यात येईल. यावेळी मंत्री महोदयांनी आयुर्वेदीक, ॲलोपॅथीक औषधांच्या निर्मिती व विक्रीबाबत विचारणा केली. यावेळी अन्न वऔषध प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सौजन्य : जिमाका