भाजपनं विधान परिषदेसाठी आपले चार उमेदवार जाहीर केलेत. या नावांमध्ये सर्व महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं ‘नाथाभाऊं’चं नाव उमेदवारांच्या यादीत नव्हतं. ज्या एकनाथ खडसेंनी आयुष्याचा ‘उमेदी’चा काळ भाजपसाठी झटत पक्षाला सत्तेची ‘उम्मीद’ दिली तेच आज परत ‘उमेद’वारी’ न मिळाल्यानं विधान परिषदेच्या ‘वारी’पासून ‘वंचित’ राहीलेत. भाजपमध्ये काल आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, राजहंस सिंह यांसारख्या ‘उपऱ्या-आयारामां’ना विधान परिषदेची ‘सरदारकी’ मिळते. मात्र, आयुष्यभर पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या नाथाभाऊ, माधव भंडारी, चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्यांच्या बापानं महाराष्ट्रात पक्ष विस्तारला त्या गोपीनाथ मुंडेंच्या पोरीला ते भाग्य लाभत नाही. एकनाथ खडसे… अख्ख्या आयुष्याचा ‘सात-बारा’च भाजपच्या नावावर केलेला महाराष्ट्रातला अतिशय रांगडा नेता…महाराष्ट्रात रामभाऊ म्हाळगी, वसंतराव भागवत, उत्तमराव पाटील, सुर्यभान वहाडणे पाटील, बाळासाहेब नातू, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर अन अनेक अनाम समर्पीत कार्यकर्त्यांसोबत यांनी पक्ष बांधला. कोथळीसारख्या गावातल्या या कार्यकर्त्यानं हा पक्ष खान्देशात, महाराष्ट्रात पोहोचवलाय. ४० वर्षांपासून नाथाभाऊंनी पक्षासाठी काटे तुडवलेल्या मार्गावर आज ‘कमळ’ फुलांचा सडा पसरवलाय… मार खाल्ला, लाठ्या-काठ्या खाल्ल्यात पण पक्ष सोडला नाही. त्यांची अवस्था काय… त्यांना सभागृहात चौथ्या रांगेत बसवण्यात आलं होतं… कोल्हापुरात व्यासपीठावर एका कोपऱ्यात बसवण्यात आलं. अन शेवटी तर आयुष्याच्या संध्याकाळी सन्मानानं निरोप देण्याऐवजी थेट तिकीटच कापलं… ते कापून मुलीला तिकीट दिलं गेलं. तिचाही पराभव घडवून आणण्यात आला. खडसेंना महाराष्ट्राचं ‘अडवाणी’ करण्यात आलं. ज्या बापानं महाराष्ट्रात ‘भाजप’ नावाचं राजकीय घर बांधलं. त्याच बापाला घराबाहेर हाकलण्याचा प्रकार महाराष्ट्रातील पक्षाचं अलिकडे नेतृत्व करणाऱ्या त्या पक्षातील नेत्यांनी केला, असं म्हणावं लागेल… जेष्ठ मराठी लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या ‘वृषभसूक्त’ काव्यसंग्रहातील डंगऱ्या’ ही कविता नाथाभाऊंच्या आजच्या परिस्थितीत यथार्थ चित्रण करणारी आहेय. विदर्भाच्या बोलीभाषेत ‘डंगऱ्या’चा अर्थ ‘म्हातारा बैल’ अशी होते. ‘डंगऱ्या’ जान जवान खपतोबैल वेचतो आयुष्यमाणसाचा वर्तमानहोय उज्वल भविष्य… खुंटा सोडतो ना कधीकधी टाकतो ना औतजीव जीवात ओततोरातंदिवस राबत… सुख, दु:खाच्या घरातत्याने आसवे गाळलीसग्या-सोयऱ्या परीसनाळ नात्याची जुळली… खाई कडबा कुटारदेई पुरणाची पोळीवाड्यातील दिवाळीलाकरी जीवाचीच होळी… जिथे गळे घाम त्याचातिथे फुले उगवलीभूक तहान सोशीतभूतमात्रा जगवली श्वास गहाण टाकलाजीव जीवास लावलाबैल शब्दालागी अर्थसमर्पणाचा लाभला… दारी खेळले वासरूगोऱ्हा पटात धावलानांगरता वखरताजीव बैलाचा कावला… वय उतारास लागेशक्ती हीनदीन होतीकाढी मातीतून सोनेआता होय त्याची माती… उभी हयात वेचलीइमानाने शिवारातकुणी करंटा विकतोडंगऱ्याला बाजारात… माय होऊन सोसलेबापासारखे पोसलेपुण्यवान त्या तपालाफळ आलेले कसले?… उपकाराच्या तोंडालाअसे काळे फासलेलेअन कृतज्ञ शब्दाचेअर्भ सुळी चढलेले तुका म्हणे ऐशा नरामारा अनंत पैजाराजीव खुंट्यावर जायबैल भाग्यवान खरा… सध्या महाराष्ट्र अतिशय वाईट कालखंडातून जातो आहे. अशा कालखंडात सरकारचे कान उपटायला ‘नाथाभाऊं’सारखा कसलेला, मुरब्बी, अनुभवी संसदपटू विधीमंडळात असणं फार आवश्यक होतं. मात्र, ‘रामा’चं नाव घेणाऱ्या भाजपच्या संस्कृतीत अलिकडे ‘आयारामां’ची चलती असल्यानं नाथाभाऊंसारख्यांना डावलणं फार आश्चर्य वाटण्यासारखं नाही. शेवटी नाथाभाऊंच्या विधीमंडळातल्या शेवटच्या भाषणातील समारोपासारखंच ‘कालाय तस्मै नम:’… – उमेश अलोणे, अकोला. |