खामगाव: स्थानिक शहरातील रेल्वेगेट परिसरातील न्यायालयाच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी आज पोलिसांसह महसूल पथक पोहोचल्यानंतर अतिक्रमणधारक परदेशी याने राडा केला.तसेच त्याने घरातील बॉटलमध्ये असलेले पेट्रोल अंगावर घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने यावेळी एकच खळबळ उडाली.पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करीत सदर इसमाला ताब्यात घेतले आहे.रेल्वेगेट परिसरात ज्या ठिकाणी परदेशी कुटुंबीय राहत आहे.ती जागा न्यायालयाची आहे.गेल्या काही वर्षांपासून याबाबतचे प्रकरण न्यायालयात सुरू होते.दरम्यान चौकशी समितीच्या अहवालानंतर न्यायालयाने सदर जागा अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आज सकाळी खामगाव नगर पालिका,तहसील प्रशासन पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणस्थळी पोहोचून अतिक्रमणधारक इसमाला सदर जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी परदेशी यांनी नकार देत वाद घातला.त्यानंतर त्यांनी घरातील पेट्रोलची बाटली आणून अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.यामुळे एकच खळबळ उडाली होती.मात्र पोलिसांनी समयसूचकता दाखवत दिपक परदेशी यांना ताब्यात घेतले.त्यानंतर अतिक्रमण काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या.परदेशी यांना पोलीस स्टेशनला बसून ठेवले होते.मात्र सदर इसमाने पोलीस स्टेशनमधून पळ काढून घराकडे पळत सुटला पोलीस त्याच्या मागे होते.दरम्यान परदेशी यांनी रस्त्याच्या बाजुला असलेल्या नारळ विक्रेत्याचा कोयता हातात घेऊन अंगावर गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची प्रक्रिया सुरू होती.