प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद….
खामगांव : गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेली लालपरी आज खामगाव आगारातून धावली असून दोन एसटी बसेस प्रवाशांना घेऊन शेगाव कडे रवाना झाल्या आहेत. त्यामुळे खामगाव बस स्टॅन्ड वर आज लालपरी सुरू झाल्याच्या आनंदात प्रवास चेहऱ्यावरती हास्य उमटले होते. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील एसटी आगारतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. काही ठिकाणी एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे हाय कोर्टाने कर्मचाऱ्यांना संप थांबवण्याचे आणि कामावर परत येण्याचे आदेश दिले आहेत तरी सुद्धा संप सुरुच आहे. एसटी महामंडळाने देखील पत्राद्वारे कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती करत कामावर येण्यास सांगितले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली आहे. तरी सुद्धा काही ठिकाणी एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बस संघटनांना बस स्थानकावरुन बस गाड्या सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. पण खासगी बसचा प्रवास परवडत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काही एसटी आगारातील कर्मचारी संपातून माघार घेत नसून आणि कामावर परत येत नाही आहे हे पाहून खामगाव आगारातील आगार व्यवस्थापक पवार यांनी दोन खाजगी कंत्राटी चालकाना आज बोलवण्यात आले होते. खामगाव बस स्थानकातून खामगाव ते शेगाव या मार्गावर दोन एसटी बसेस सोडण्यात आल्या. सदर एसटी बसेसला पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात आले होते. यावेळी एसटी बस मध्ये ५५ प्रवासी शेगाव येथे एसटी बस मधून मार्गस्थ झाले. यावेळी आगार व्यवस्थापक पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की, प्रवाशांचे हाल होत असून, आपण लवकरात लवकर कामावर रुजू होण्याबाबत सांगितले आहे.