विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ५० टक्के क्षमतेवर परवानगी देण्याची केली होती मागणी…
खामगांव : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट देखील तीन टक्क्यांपेक्षाही कमी आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निकषानुसार बुलडाणा जिल्हा अनलॉक च्या पहिल्या लेव्हल मध्ये आला असून सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने व इतर सेवा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले होते. यामध्ये शॉपिंग मॉल , सिनेमागृहे , थिएटर यांना ५० टक्के क्षमतेसह परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे , खाजगी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय हे सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नव्हता.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता ५० टक्के क्षमते सह खाजगी कोचिंग क्लासेसना सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर असोसिएशन बुलडाणा कोचिंग क्लासेस च्या संचालकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली होती. याबाबत आज जिल्हाधिकारी यांनी खाजगी क्लासेस सुरु करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस संचालकांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रोफेशनल टीचर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर यांनी शासनाचे व जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून प्रत्येक बॅच मध्ये फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करून क्लासेस सुरू करण्यात येतील असे सुद्धा प्रा.रामकृष्ण गुंजकर यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना सांगितले आहे.