अकोला : २२ जुलैची मध्यरात्र… मध्यरात्रीच्या ठोक्यानंतर रात्रीनं गुरूवारकडे कुस बदलली होती. रात्रीचा एक वाजला असेल. यावेळी संपूर्ण अकोला शहर गाढ झोपेत गेलेलं… बाहेर पावसाची रिप-रिप सुरू होती. कित्येक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसानं हजेरी लावली होती. त्यामूळेच पाणीटंचाई, दुबार पेरणीचं मळभ दुर झाल्यानं त्या दिवशीची अकोलेकरांची झोप काहीशी मनाला निश्चिंत करणारी… वरून ‘वरूणराजा’चं धो-धो बरसणं निरंतर सुरूच होतं. झोपेमूळं पेंगुळलेल्या अकोलेकरांना आपल्या पुढ्यात समोर कोणतं ‘महासंकट’ ओढवणार आहे, याची पुसटशी कल्पनाही यावेळी नव्हती. तिकडे पावसानं शहरातून वाहणारी मोर्णा अन शहराच्याबाहेर तिला भेटलेली ‘विद्रुपा’ या दोन्ही नद्या फुगायला लागल्या होत्या. अन रात्री दीडच्या सुमारास या दोन्ही नद्यांनी आक्राळ-विक्राळ रूप धारण करीत अकोल्यात सुरू केलं अक्षरश: ‘तांडव’. या दोन्ही नद्यांचं पाणी एकाएकी अनेक भागातील घरांत शिरायला लागलं. घरात असलेल्या लोकांना घरात ‘खळखळ’ आवाज अन जाणवलेल्या गारव्यानं खाडकन जाग आली. अन समोरचं दृष्य पाहून अनेकांची पाचावर धारण बसली. अनेकजण पार गलितगात्र होऊन गेलेत.
नदीमाय थेट त्यांच्या घरट्यात शिरली होती. तीनं घरात प्रवेश करतांनाच घरातील सर्व सामान, धान्य, वस्तू, फर्निचर असं काही आपल्या कवेत घेत त्यांना अक्षरश: चिखलात न्हाऊ घातलं होतं. घरात पाणी आलं असतांना नागरिकांना स्वत:चा जीव वाचविण्याशिवाय काहीच करता आलं नाही. ज्यांचं घर दुमजली आहे, ते पहिला मजला सोडून दुसऱ्या मजल्यावर गेलेत. ज्यांचं घर एकमजली आहे, ते टेरेसवर गेलेत. मात्र, ज्यांचं घरच फक्त निवाऱ्यापुरतं होतं, त्यांना अक्षरश: रस्त्यावर यावं लागलं. अनेकांनी 'ती' काळरात्र अक्षरश: जीव मुठीत धरत जागून काढली. एका क्षणार्धात पार होत्याचं नव्हतं झालं. अनेकांच्या घरातील धान्यासोबतच त्यांच्या स्वप्नांचंही पार 'म्हातेरं' झालेलं होतं.
अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारच्या एका दिवसभरात विक्रमी 202.9 मिलीलीटर पाऊस झाला होता. या ढगफुटीसदृष्य पावसाने अकोला शहरासह संपुर्ण जिल्ह्यात पुर परिस्थिती निर्माण होत हाहाकार उडाला होता. अकोला शहरातील मोर्णा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. तर शहरातील अनेक वस्त्यांमधील घरातही पाणी शिरले होते. अकोला शहरातील खडकी, कौलखेड, न्यू खेतान नगर, चांदूर, गीतानगर, एमरॉल्ड कॉलनी, अनिकट, जुने शहरातील जाजूनगर अशा अनेक भागात पावसाचं पाणी घुसलं. कौलखेड भागातील प्राजक्ता कन्या शाळेमागच्या परिसरातील जवळपास दोनशे घरं पाण्याखाली आली होती. यामूळे अकोला शहरातील जवळपास तीन हजार नागरिकांना विस्थापित करावं लागलं होतं.
काय कारणं आहे अकोल्यात पुर परिस्थितीनं उडालेल्या हा:हाकाराची? :
अकोला शहरात 22 जुलैला आलेला महापुर हा गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठा पुर होता. याआधी नव्वदच्या दशकात 1994 मधील महापुराच्या आठवणी सांगतांना अकोलेकर आजही अगदी शहारून जातात. मात्र, तेंव्हाच्या आणि आताच्या पुरात एक मूलभूत अन जमीन-अस्मानचा फरक आहे. तेंव्हाचा पुर हा फक्त 'अस्मानी' होता. तर आताचा पुर हा जसा 'अस्मानी' आहे, तसाच तो 'सुल्तानी'सुद्धा आहे. कारण, सध्याच्या पुराला फक्त मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस हा फक्त निमित्तमात्र आहे. तर खरी कारणं दडली आहेत अकोल्यात मोर्णा नदीतील जलकुंभीप्रमाणे फोफावलेले शहरातील लँडमाफीया, त्याला राजकारणाआड पोसणारे काही भ्रष्ट राजकारणी अन या सर्वांच्या तालावर नाचणाऱ्या प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्ती.
विदर्भात नागपूरनंतर सर्वार्थाने दुसऱ्या क्रमांकाचं शहर म्हणजे अकोला. उद्योग, शेती, व्यवसाय आणि रोजगार या सर्वच आघाड्यांवर अकोला शहराचं योगदान मोठं आहे. जवळपास सात लाख लोकसंख्येचं अकोला मात्र अलिकडे अक्षरश: अरिष्टांच्या कचाट्यात सापडलं की काय?, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. गेल्या अडीच दशकात शहराच्या मुलभूत ओळख आणि रूपाचे लचके तोडणाऱ्या अनेक प्रवृत्ती शहरात फोफावल्या आहेत. ते आहेत लँडमाफीया, भ्रष्ट राजकारणी अन त्याला कायद्याच्या पंखाखाली घेत राजरोसपणे कायद्याचा गळा घोटणारी व्यवस्था.अकोला शहराला अतिक्रमणाचा मोठा शाप आहे. कधीकाळी अकोला शहराची जीवनवाहिनी समजली जाणारी मोर्णा नदी याच अतिक्रमणामुळे शहरात अनेक ठिकाणी 'नाला' बनली आहे. तर काही ठिकाणी अक्षरश: 'नाली' झाली आहे. याला कारण आहे मोर्णेच्या नदीकाठावर अगदी नदीपात्रापर्यंत झालेलं अतिक्रमण. अगदी हिंगण्यापासून तर थेट गडंकीपर्यंत मोर्णा अतिक्रमणामूळे हरवली आहे. प्रशासन, महापालिका आणि राजकारण्यांनी या अतिक्रमणाला पायबंद न घालता एकप्रकारे प्रोत्साहनच दिलं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. शहरातील अनेक छोटे नाले अन नाल्या बुजवून त्यावर अतिक्रमण करीत मोठमोठ्या इमारती तयार झाल्या आहेत. शहरातील गीतानगर, अकोली, एमरॉल्ड कॉलनी, जुने शहरातील जाजू नगर, गोडबोले प्लॉट, कालखंड भागातील न्यू खेताननगर, ड्रिमलँड कॉलनी, खडकी, चांदूररोड या भागात तर अक्षरश: नाले रुजविण्यात आलेत. त्यावर प्लॉट पाडून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ते लोकांना कोट्यावधींत विकण्यात आलेत.अकोल्यातील एमरॉल्ड कॉलनी भागात एका शाळेने तर चक्क नालाच गायब करीत त्यावर शाळेची टोलेजंग इमारत उभी केली. हाच नाला नसल्याने दरवर्षी पाऊस आला की एमरॉल्ड कॉलनीतील ़घरांत पाणी घुसतं. याला विरोध कोण करणार?. कारण याला शहरातील एका राजकारण्याचं मोठं अभय ़़आहे. अकोल्यात पुराचं पाणी घुसलेल्या एमरॉल्ड कॉलनी, अकोली, हिंगणा, न्यू खेताननगर, खडकी या भागात याच राजकारण्याच्या 'साईट' आहेत. यातील बराचसा भाग हा पुर नियंत्रण रेषेत येत असतांना या भूखंडांना 'अकृषक परवाना' (एनए) देण्यात आला. चांदूर भागात अगदी विद्रूपा नदीच्या पुर कक्षेत येणाऱ्या जमिनीलाही हा परवाना देण्यात आला. हेे सारं कसं होतंय?. देशाचे अन राज्याचे कायदे अकोल्यात लागू नाहीत का?. प्रशासन अशा कामं अगदी राजरोसपणे करतं यात कोणता 'अर्थ' लपला आहे?. याऊपरही महापालिका अशा ठिकाणी बांधकामाला परवानगी कशी देते?. या सर्व प्रश्नांची सामाईक उत्तरं भूमाफिया, भ्रष्ट राजकारणी आणि त्यांना झेलणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेत दडलेली आहे. दुर्दैवानं यात भरडला गेला तो सर्वसामान्य अकोलेकर.
अकोला महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण :
कोणत्याही शहराचं नियोजन असतं त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हातात. मात्र, अकोला शहराच्या बकाल रूपाला खऱ्या अर्थानं सर्वाधिक जबाबदार आहे ती अकोला महानगरपालिका. कारण, शहरातील अतिक्रमण, अवैधपणे अकृषक परवाना मिळालेल्या जमिनीवर बांधकामाच्या परवानग्या महापालिकेत बिनबोभाटपणे दिल्या गेल्यात. यात पैशांसाठी सर्व नियम धाब्यावर बसवले गेलेत. शहरातील नालेसफाईचं काम सदैव थातूरमातूरपणे केलं जातं. यातला मलिदा प्रशासन, सत्ता आणि विरोधकांतील भ्रष्ट प्रवृत्ती अगदी मिळून खातात. अकोल्यातील पूर परिस्थितीला हेच सर्व घटक जबाबदार आहेत. महापालिकेत 'सबका साथ, सबका विकास' या तत्वानं ही कामं अगदी बिनदिक्कतपणे सुरू असल्याने येथे सत्ताधारी-विरोधक या भेद अगदी धुसर होत जातो. अकोल्यातील अवैध बांधकामाचे मूर्तिमंत प्रतिक असलेलं सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोरच्या नाल्यावरचं बांधकाम. हे या भ्रष्ट युतीचं जीवंत उदाहरण म्हणता येईल. येथील नाल्यावर अतिक्रमण करीत एका इमारतीचं काम सध्या अर्धवट स्थितीत आहे. यात महापालिकेतील वेगवेगळ्या पक्षांतील काही नगरसेवक भागीदार आहेत. महापालिकेची हे अवैध बांधकाम पाडण्याची कधीच हिंमत झाली नाही.
अकोलेकरांची स्वप्नं मातीमोल करणाऱ्यांवर कारवाई होणार काय ?
अकोल्यातील महापुरात हजारो लोकांचं सर्वस्व मातीमोल झालं. बिल्डरांनी लोकांना स्वप्नातील घरांचं वचन देत लाखो रूपयांना घरं आणि प्लॉट्स विकलेत. पाऊस अन पुराचा कोणताही धोका या भागात राहणार नाही, अशी खोटी हमी दिलीत. मात्र, मोर्णा आणि विद्रुपा नदीसह अनेक नाल्यांना आलेल्या महापुरानं अनेकांच्या स्वप्नांचा पार चिखल झाला. संपूर्ण आयुष्याची पुंजी या घरांत गुंतवलेल्या या नागरिकांसमोरचं भविष्य आता अंध:कारमय झालं आहे. या संकटानंतर आता हे बिल्डर्स अन लँड माफिया यातून नामनिराळे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कसोटीच्या काळात आता या लोकांच्या पाठीमागे सरकार राहणार का?. की पैसा आणि सत्ता पाठीशी असणाऱ्या या लोकांना शासन अन व्यवस्था वाचविणार हा खरा प्रश्न आहे.अकोल्यात नेहमीपेक्षा बरसलेल्या या पावसानं अकोलेकरांच्या नशिबी आलेल्या एका अभद्र युतीला उजागर केलं आहे. शहरात 'व्हाईट कॉलर' लोकांच्या रूपात समोर आलेल्या तथाकथित लँडमाफिया, या लँडमाफियांना बळ देणारे काही राजकारणी अन या दोघांच्या तालावर नाचणारं सरकार अन त्यांचं प्रशासन अशी ही युती सर्वसामान्यांच्या जीवावर उठणारी आहे. यात सर्वसामान्य अकोलेकरांच्या 'हसऱ्या' घरांची स्वप्नं मात्र पार 'माती'त मिसळली गेलीत. अकोलेकरांनो!, आता सावध ऐका पुढल्या हाका... तुम्ही वेळीच सावध नाही झालात तर तुम्हाला भविष्यात 'जलसमाधी'च घ्यावी लागेल. बघा!, स्वत:ला वाचवायचं की नाही मग.
साभार: उमेश अलोणे, एबीपी माझा प्रतिनिधी, अकोला