वंचितचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांचा आरोप
दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा
खामगाव : अंबिकापूर चितोडा येथील वाघ व हिवराळे या दोन कुटुंबात झालेल्या हाणामारी प्रकरणात खासदार प्रतापराव जाधव यांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली भूमिका ही जातीय तेढ निर्माण करणारी आहे असा आरोप वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी केला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी अंबिकापूर चितोडा गावात गेल्या १९ जून रोजी वाघ व हिवराळे कुटुंबात हाणामारी झाली. यात चाकू हल्ला झाला यामध्ये रमेश हिवराळे हा गंभीर जखमी असून अकोला येथील खासगी रुग्णालयात जीवन मरणाशी झुंज देत आहे. तर वाघ कुटूंबाचे घर व वाहनाचे नुकसान झाले.या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू असून आरोपींना अटक करण्यात येत आहे.

ही घटना झाल्यानंतर २६ जून रोजी बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व इतरांनी यांनी अंबिकापूर चितोडा गावात भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ वाघ कुटुंबियांची भेट घेतली व एकतर्फी बाजू समजावून घेतली. यानंतर खामगाव येथील विश्रमगृहा मध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जाधव यांनी हे प्रकरण सामंजस्यपणे न हाताळता दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले. एकतर्फी बाजु मांडत त्यांनी जातीयवादाला रूप देऊन दोन समाजात अराजकता व अशांतता पसरवण्याचे काम केले. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी हे सर्व मतदारांचे असतात. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालत आहेत.

कोणावरही अन्याय होणार नाही याबाबत ते दक्ष असतात मात्र त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दोन्ही कुटूंबाला भेट न देता केवळ एकच बाजू रेटत पोलीस प्रशासनावर दबाव आणून निरपराध लोकांना या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न चालविला आहे असे गणेश चौकसे यांनी सांगितले. या प्रकरणी खासदार जाधव यांनी जातीयवादाचा रंग न देता दोन्ही कुटूंबाचे हित जोपासत गुन्ह्यातील मुख्य आरोपींना शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे. प्रशासनाने राजकिय ताकदीला बळी न पडता आपले काम करावे व अंबिकापूर, चितोडा गावात पुनश्च शांतता निर्माण करावी असेही गणेश चौकसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज्य उपाध्यक्ष शरद वसतकार,जिल्हा महासचिव ऍड.अनिल ईखारे,तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, राजेश हेलोडे, संघपाल जाधव, प्रकाश दांडगे, सुभाष सुरवाडे यांच्यासह वंचित बहूजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.