प्रचंड वेदनादायी आणि दुर्दैवी घटना
सायंकाळी स्फोटकांच्या सहाय्याने या दख्खनच्या राज्यातील एक ऐतिहासिक ठेवा उद्धवस्त करण्यात आला. तो वाचवण्यासाठी मी सर्व संबधित राजकिय नेते अधिकारी व मंत्र्यांशी बोललो. बाॅम्बे हायकोर्टला मेल द्वारे तक्रारही दिली. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शासन-प्रशासनातल्या एकाही माणसाला हे कळलं नाही कि हा “ब्रिज” नाही. हे ‘दख्खन’ ते ‘कोकण’ या दोन प्रदेशानां जोडणारे प्रवेशद्वार आहे. हे कोणी समजूनच घेतलं नाही. त्यामुळे आज आपण दख्खनच्या राज्यातला एक ऐतिहासिक ठेवा उद्ध्वस्त करून इतिहास नष्ट केला आहे. त्याला इतिहास कधीच माफ करणार नाही…!
रस्ते अपघाताचे कारण पुढे करत हे बांधकाम पाडणं म्हणजे मूर्खपणा होता. या बांधकामाला अनेकजण अमृतांजन ब्रिज म्हणतात. स्वत: सार्वजनिक बांधकाम विभागाचे लोक पण या ऐतिहासिक दरवाजाला ब्रिज संबोधतात यासारखं दुर्दैव नाही. जगात ब्रिजच्यावरून वाहतुक होत असते. हे तरी किमान ‘माणसानां’ समजायलं हवं होतं. पण या कथित ‘अमृतांजन ब्रिज’च्या कमानी खालून वाहतुक का होते? हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्यात भरती झालेल्या XXX पडला नाही. पावणे दोनशे वर्षांपूर्वी हत्ती, उंट, बैल, घोडा, गाढवासारख्या प्राण्यानां या कमानीतून जाताना हि स्वागत कमान आहे याची नक्की जाणीव झाली असेल. पण आताच्या माणसांना का झाली नसेल? खरं तर हा ब्रिजच नाही. ती “दख्खन ते कोकण” या दोन प्रांताना जोडणारी स्वागत कमान आहे. ज्याने हे बांधकाम केले त्या Capt Hughes याने त्यासाठी स्वच्छ इंग्रजीत ”Durwazu or Gateway” हा शब्द वापरला आहे. पण आपल्याकडे काही समजून न घेता ते नष्ट करण्याला अधिक प्राधान्य… टेंडर निघाले…काॅन्ट्रॅक्ट मिळालं…याला फार महत्व…. मात्र हे नेमकं बांधकाम कशाचं आहे ? हे साधं समजूनसुद्धा घेतलं जात नाही हे मनाला खूप वेदना देणारं आहे. आपण पुढाऱ्यानां ‘जाणते’ का म्हणतो? हे मला समजलं नाही. या घाटाचं संपूर्ण रेकाॅर्ड शोधून मी काढलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता.
अगदी “पहिला टोल नाका” कधी उभारला? त्याचा कायदा कसा केला? त्या कायद्यातल्या सुधारणा कशा होत गेल्या? यापासून ते टोल वसूलीचे दर आणि नियम याचा कायदा सुद्धा उपलब्ध आहे. पण असो… गेले दोन दिवस मी हा ठेवा उद्ध्वस्त करू नये यासाठी सर्व प्रयत्न केले. पण त्यात अपयश आले. मी हतबल होतो. हा ऐतिहासिक ठेवा संरक्षित रहावा यासाठी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दोन वेळा फोन केला पण पवार साहेब मिटिंगमध्ये बिझी होते. मिटिंग झाली की जोडून देतो असा आॅपरेटरने निरोप दिला. पण आतापर्यंत त्यांचा संपर्क झाला नाही. त्यांचे पीए राऊत यांनाही दोन वेळा फोन केला. त्यानीही नाही उचलला. त्याचबरोबर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यानाही काॅल केला. त्यांनी सर्व तपशील समजावून घेतला. त्यांना सर्व संदर्भ पाठवले. पण कार्यवाही काहीच नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना सांगितलं. त्यांनी तर खूप धक्कादायक उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्ही अजित पवार यानां फोन करा. ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मला तर हा खूप मोठ्ठा जोक वाटला. जे अशोक चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी असं उत्तर देणं मला खूपच धक्कादायक वाटलं. खरं तर त्यांच्या खात्याशी संबधित वास्तू होती. पण त्यांना याचं गांभिर्यच समजलं नाही. असं मला वाटतं.
या प्रकरणात सर्वात महत्वाची व्यक्ती होती ती म्हणजे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे…सलग आणि सतत प्रयत्न करूनही त्यांनी एकही काॅल रिसिव्ह केला नाही. त्यांच्या पीएने पण नाही. तीच परिस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…कोरोनामुळे हे सर्वजण प्रचंड बिझी असणार आहेत. याची मला पूर्णपणे जाणीव आहे. तरीही हा ठेवा वाचवता येईल अशी आशा होती. पण कोरोणाच्या कारणांमुळे यातल्या एकाही जबाबदार नेत्याशी संपर्क झाला नाही. तीच गत अधिकाऱ्यांची… राध्येशाम मोपलवार नो रिस्पाॅन्स,…अजाॅय मेहता यांनी फोन कट केला… अनिल कुमार गायकवाड तसेच सर्व संबधित अभियंता यांना खूप प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही. हे खूप दुर्दैवी होतं. या संपूर्ण घडामोडीत मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीसाठी मेल पुढे पाठवल्याचा रिप्लाय मिळाला. पण कार्यवाही शून्य… तसेच अजित दादांचे पुत्र पार्थ पवार यांनी मात्र ऐतिहासिक महत्व समजून घेवून ही बाब दोन अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. पण त्यातून फारसं काही हाती लागलं नाही. त्याचबरोबर अजित दादांचे पीए मुसळे यांनी संबधितांशी संपर्क करून देण्याची मदत केली. हीच यातली जमेची बाजू होती. बाकी पदरी निराशाच होती.कोरोनाची आयती संधी साधून दख्खनच्या राज्याचा ऐतिहासिक ठेवा नष्ट करणाऱ्या राजकारण्यानां आणि प्रशासनातल्या इतिहास कधीच माफ करणार नाही.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरची वाढती वाहतुक लक्षात घेता आणि अपघाताचे प्रमाण लक्षात घेता धोकादायक वळणे दूर केलीच पाहिजेत. त्याकरिता हा ठेवा नष्ट करणे हा काही पर्याय नाही. त्यासाठी या कमानीच्या आधी बोगदा काढून हा दुर्दैवी प्रसंग सहज टाळता आला असता. पण गाढवांच्या कळपात राहून घोड्यासारखं धावता येत नाही. याची मलाही जाणीव आहे. हा ऐतिहासिक ठेवा नष्ट केल्याच्या कृतीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि सर्व संबधित जबाबदार शासन-प्रशासनाला इतिहास कधीच माफ करणार नाही. एवढच सांगून तूर्त तरी थांबतो… (https://twitter.com/chandupatil25/status/1246323574115143682?s=03)
– चंद्रकांत पाटील (नवी मुंबई)