डॉक्टरांचे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
खामगाव: डॉक्टरांनी अतिक्रमण केल्याच्या पुराव्यानिशी तक्रारी दाखलकेल्यानंतर ही नगर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्या बालरोग तज्ज्ञाला पाठीशी घातल्या जात आहे. डॉ. अमीत देशमुख यांनी सर्व्हिस गल्लीवर केलेले अतिक्रमण गत अनेक दिवसांपासून जैसे थे असल्यामुळे तक्रारदाराने कंटाळून थेट आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.मात्र, शासकीय काम अन् बारामहिने थांब असाच प्रत्यय तक्रारकर्त्याला पालिका प्रशासनाकडून येत आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यासोबतच तर थेट मुख्याधिकारी यांच्यावर सुध्दा आता कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.सिव्हील लाईन भागातील आकाश विठ्ठलराव सातपुतळे यांनी प्रभागातील मंजुर झालेली नाली निर्मितीसाठी नगर परिषदमध्ये विनंती अर्ज केला.मात्र ज्या ठिकाणी नाली मंजुर झाली आहे. बालरोग तज्ज्ञ डॉ.अमित देशमुख यांनी अतिक्रमण करून शेड बांधले आहे. त्यामुळे या परिसरातील विकासकामाला खिळ बसली आहे. वेळोवेळी नागरीकांनी सदर अतिक्रमण हटविण्याबाबत नगर परिषदकडे तक्रारी केल्यावरही कारवाई होत नसल्याने मुख्याधिकारी यांचा डॉ.अमित देशमुख यांना अर्थपूर्ण व्यवाहारातून छुपा पाठींबा असल्याची चर्चा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा!
अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या शहरातील सामान्य नागरिकांना आता जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा आहे. नगर पालिका प्रशासन आणि मुख्याधिकाऱ्यांकडून कारवाईस चालढकल केली जात आहे. त्यामुळे तक्रारकर्ते आकाश सातपुतळे यांनी आपले सरकार पोर्टलव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकतीच तक्रार दाखल केली आहे.अतिक्रमण हटवून अतिक्रमण धारकांना अभय देणाऱ्यां मुख्याधिकारी मनोहर आकोटकर यांच्यावर सुध्दा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.